"या अनपेक्षित निकालाने..."; हरयाणातल्या पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 11:57 AM2024-10-09T11:57:55+5:302024-10-09T12:09:36+5:30
हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Rahul Gandhi on Haryana & JK Election Result : उत्तर भारतातील हरयाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. हरयाणात भाजपने हॅट्ट्रिक केली आहे. भाजपने काँग्रेसचा दारुण पराभव करून पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीने विजय मिळवला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. दुसरीकडे, हरयाणाच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे आणि याचा परिणाम इतर राज्यांतील निवडणुकींमध्येही होण्याची शक्यता आहे. या निकालावर विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे.
हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. हरयाणात भाजपने हॅट्ट्रिक साधत मोठा विजय नोंदवला आहे. त्याचबरोबर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचा जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. हरयाणातील सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसला बहुमत दिसत होते. पण काही काळानंतर चित्र बदलले आणि आता काँग्रेस पक्षाला सलग तिसऱ्यांदा सत्तेबाहेर राहावे लागणार आहे.
"जम्मू-काश्मीरच्या जनतेचे मनापासून आभार. राज्यातील इंडिया आघाडीचा विजय हा संविधानाचा विजय आहे, लोकशाही स्वाभिमानाचा विजय आहे. हरयाणाच्या अनपेक्षित निकालाचे आम्ही विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या तक्रारींची माहिती निवडणूक आयोगाला देणार आहे. पाठिंब्याबद्दल हरयाणातील सर्व लोकांचे आणि आमच्या बब्बर शेर कार्यकर्त्यांचे त्यांच्या अथक परिश्रमाबद्दल मनःपूर्वक आभार. हक्क, सामाजिक आणि आर्थिक न्याय आणि सत्यासाठी आम्ही हा संघर्ष सुरूच ठेवू आणि तुमचा आवाज बुलंद करत राहू," असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
जम्मू-कश्मीर के लोगों का तहे दिल से शुक्रिया - प्रदेश में INDIA की जीत संविधान की जीत है, लोकतांत्रिक स्वाभिमान की जीत है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 9, 2024
हम हरियाणा के अप्रत्याशित नतीजे का विश्लेषण कर रहे हैं। अनेक विधानसभा क्षेत्रों से आ रही शिकायतों से चुनाव आयोग को अवगत कराएंगे।
सभी हरियाणा वासियों को…
गेली १० वर्षे हरियाणात भाजपची सत्ता होती आणि आता तिसऱ्यांदा राज्याची सुत्रे त्यांच्याकडे आली आहे. हरयाणामध्ये भाजपने हॅट्ट्रिक नोंदवत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. पक्षाला ४८ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस आघाडीला ३७ जागा मिळाल्या आहेत. आयएनएलडी आघाडीने दोन जागा जिंकल्या असून, या निवडणुकीत जेजेपीचे खातेही उघडले नाही. तर इतर अपक्षांना तीन जागा मिळाल्या आहेत.