कर्नाटकातील प्रचारात महाराष्ट्रातील नेते गेले, तिथला निकाल काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 07:38 AM2023-05-14T07:38:00+5:302023-05-14T07:38:38+5:30
हुबळीच्या तीनपैकी २ ठिकाणी भाजप व एका ठिकाणी काॅंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला तर इंडी आणि धारवाड येथे काँग्रेसने बाजी मारली.
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते गेले होते. आता निकालात तिथे काय झाले, याची सर्वाना उत्सुकता लागली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुबळी, धारवाड आणि इंडी येथे गेले होते. हुबळीच्या तीनपैकी २ ठिकाणी भाजप व एका ठिकाणी काॅंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला तर इंडी आणि धारवाड येथे काँग्रेसने बाजी मारली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कापू आणि उडुपी येथे भाजप उमेदवाराचा प्रचार केला. कर्नाटकचा हा भाग भाजपचा बालेकिल्ला आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निपाणी येथे सभा घेतली होती. मात्र तेथे राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही निपाणीला भेट दिली होती. काँग्रेस तिथे तिसऱ्या नंबर राहिली आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी बेळगाव ग्रामीणमध्ये प्रचार केला होता. तेथे काँग्रेसने बाजी मारली आहे. ते खानापूर येथेही गेले होते, खानापूरला मात्र भाजपचा विजय झाला.
सरकार पाडणाऱ्या ११ बंडखोरांचा पराभव
बेळगाव - कर्नाटकातील काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) सरकारविरोधात बंड केलेल्या १७ आमदारांना कन्नड जनतेने या निवडणुकीत धडा शिकवला. पक्षांतर केलेल्या १७ मतदारसंघांपैकी फक्त ६ ठिकाणी उमेदवारांना आपली आमदारकी वाचवता आली आहे. ११ ठिकाणी काँग्रेस, जनता दलाने विजय मिळवत गद्दारी करणाऱ्यांचे उट्टे काढले आहे.
पाच मराठा चेहरे -
- कर्नाटक विधानसभेच्या नव्या सभागृहात पाच मराठा
चेहरे असतील. यातील काँग्रेसचे तीन आणि भाजपचे दोन आमदार असतील. मावळत्या सभागृहात ही संख्या चार होती. या निवडणुकीत मराठा समाजाचे १३ जण रिंगणात होते.
- महाराष्ट्र एकीकरण समितीचे तिन्ही उमेेदवार पराभूत झाले. बेळगावच्या खानापुरात भाजपचे विठ्ठल हालगेकर यांनी काँग्रेसच्या अंजली निंबाळकर यांचा पराभव केला.
- हावेरी जिल्ह्यातील हनगलमध्ये काँग्रेसचे श्रीनिवास माने यांनी भाजपच्या शिवराज सज्जानर यांचा पराभव केला.
- धारवाडच्या कलघटगीत काँग्रेसचे संतोष लाड १४,३५७ मताधिक्याने, कलबुर्गी जिल्ह्यातील चिचोली मतदारसंघात अविनाश जाधव हे अवघ्या ८५८ मताधिक्याने तसेच
कारवार मतदारसंघातून काँग्रेसचे सतीश कृष्णा सैल २,१३८ मताधिक्याने विजयी झाले आहेत.
- श्रीमंत पाटील यांचा कागवाड मतदारसंघात भाजपचे
राजू कागे यांच्याकडून ८,८२७ मतांनी पराभव झाला.
दावणगिरी दक्षिण मतदारसंघातील कॉंग्रेसचे ९१ वर्षीय उमेदवार एस. शिवशंकरप्पा हे विजयी झाले.