हरयाणापासून महाराष्ट्र काँग्रेसने घ्यावा धडा; राहुल गांधी यांचा सल्ला; घरातील भांडणे चव्हाट्यावर आणू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:59 AM2024-10-15T11:59:07+5:302024-10-15T11:59:33+5:30

या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

Lesson to be taken by Maharashtra Congress from Haryana; Rahul Gandhi's Advice says Do not bring quarrels at home | हरयाणापासून महाराष्ट्र काँग्रेसने घ्यावा धडा; राहुल गांधी यांचा सल्ला; घरातील भांडणे चव्हाट्यावर आणू नका

हरयाणापासून महाराष्ट्र काँग्रेसने घ्यावा धडा; राहुल गांधी यांचा सल्ला; घरातील भांडणे चव्हाट्यावर आणू नका

आदेश रावल

नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकांत पत्कराव्या लागलेल्या पराभवापासून धडा घेऊन महाराष्ट्रात काँग्रेसने विधानसभा निवडणुकांत अतिआत्मविश्वास न बाळगता सावधपणे पावले उचलावीत असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये सोमवारी बैठक आयोजित केली होती. त्यात त्यांनी हे वक्तव्य केले.

या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांत नेमकी स्थिती काय आहे हे हेरून त्याप्रमाणे काँग्रेसने पावले टाकावीत. पक्षातील तंटेबखेडे चव्हाट्यावर आणणे टाळावे. पक्षांतर्गत गट-तट असतात. हरयाणामध्ये काँग्रेसमधील गटांनी एकमेकांवर जाहीर टीका केली होती. त्यामुळे पक्षाला मोठे नुकसान सोसावे लागले. तसा प्रसंग महाराष्ट्रात घडता कामा नये.

राहुल गांधी म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये एकजूट आहे असा संदेश जनतेपर्यंत गेला पाहिजे. आपल्या मित्रपक्षांबद्दल काँग्रेस नेत्यांनी चांगल्या शब्दांत विचार व्यक्त केले पाहिजेत. 

जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा नाही
- काँग्रेसचे रणनीतीकार सुनील कानुगोलू यांनी महाराष्ट्रातील जाती-समुदाय यांच्याबद्दलची आकडेवारी दिल्लीतील बैठकीत सादर केली. 
- या आकडेवारीच्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा झाली. मात्र, जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण या विषयावर विचार केला जाईल, असेही ठरले.   

काँग्रेस जाहीरनाम्यात कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य?
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी आणि बेरोजगार या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाईल अशी शक्यता आहे.

शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, बेरोजगारांना दर महिना ठराविक रक्कम, महिलांना मोफत बस प्रवास, महालक्ष्मी योजनेतून दर महिना २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करणार अशा लोकप्रिय घोषणांचा काँग्रेसच्या  जाहीरनाम्यात समावेश असू शकतो. 

त्याशिवाय दलित आणि अल्पसंख्याकांसाठीही विविध घोषणा जाहीरनाम्यात केल्या जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. 

‘जागावाटपावरून मविआत कोणतेही मतभेद नाहीत’
भाजपच्या डावपेचांवर मात करून महाविकास आघाडी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून सरकार स्थापन करेल, असा विश्वास महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांची दिल्लीमध्ये सोमवारी बैठक झाली. त्यानंतर पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत.

काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील १०, राजाजी मार्गावरील निवासस्थानी झालेल्या या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, नाना पटोले, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांबाबतच्या काँग्रेसच्या रणनीतीबद्दल बैठकीत चर्चा झाली.  महाविकास आघाडीला विजय मिळवून देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे, असे पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रावर केंद्राने अन्याय केल्याचा आरोप
गुजरातला झुकते माप देताना केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केला, असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारे प्रकल्प रोखण्यासाठी राज्य सरकारने काहीही प्रयत्न केले नाहीत, असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातो.
 

Web Title: Lesson to be taken by Maharashtra Congress from Haryana; Rahul Gandhi's Advice says Do not bring quarrels at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.