अतिशय क्रूर पद्धतीने लॉकडाऊन झाले; राजीव बजाज यांची मोदी सरकारवर घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 06:11 AM2020-06-05T06:11:55+5:302020-06-05T06:12:41+5:30
उद्योगपती राजीव बजाज व राहुल गांधी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारवर इतक्या परखडपणे देशातील कोणत्याही उद्योगपतीने जाहीर टीका केली नव्हती. लॉकडाऊन व केंद्र सरकारच्या धोरणांबाबत राजीव बजाज यांनी हातचे काहीही राखून न ठेवता आपली मते या मुलाखतीत मांडली.
शीलेश शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे साथीचा फैलाव तर रोखला गेला नाहीच शिवाय अर्थव्यवस्थेचेही प्रचंड नुकसान झाले, अशी कडक टीका ख्यातनाम उद्योगपती राजीव बजाज यांनी केली. देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत राजीव बजाज यांची काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुलाखत घेतली. त्यावेळी बजाज यांनी हे मत व्यक्त केले.
राजीव बजाज यांनी सांगितले की, पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करीत केंद्र सरकारने अत्यंत क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केले. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या सबळ वर्गातील काही प्रमाणात तग धरू शकतात. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे असे मजूर, गरीब वर्गातील लोक, शेतकरी यांच्यासाठी हा अतिशय कठीण काळ आहे. या वर्गातील लोकांना सध्या अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती डोळ्याला दिसत असूनही केंद्र सरकार त्यापासून काही धडा शिकायला तयार नाही.
उद्योगपती राजीव बजाज व राहुल गांधी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारवर इतक्या परखडपणे देशातील कोणत्याही उद्योगपतीने जाहीर टीका केली नव्हती. लॉकडाऊन व केंद्र सरकारच्या धोरणांबाबत राजीव बजाज यांनी हातचे काहीही राखून न ठेवता आपली मते या मुलाखतीत मांडली.
राजीव बजाज म्हणाले की, केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक त्रुटी आहेत. या निर्णयामुळे देशाचे दुहेरी नुकसान झाले आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आलेली नाही व अर्थव्यवस्थेचेही कंबरडे मोडले आहे. भारतामध्ये झाले त्या पद्धतीने जपान, सिंगापूर, युरोप, अमेरिकेमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलेले नाही, असे त्या देशांत राहाणाऱ्या माझ्या नातेवाईक, मित्रमंडळींनी कळविले आहे. जागतिक महायुद्धांच्या काळातही अशा वाईट पद्धतीने लॉकडाऊन अमलात आले नव्हते.
सरकारविरोधात बोलल्यास कोसळते संकट
राजीव बजाज म्हणाले की, एखाद्या घटनेचा नामवंत लोकांना तडाखा बसतो तेव्हा तो चर्चेचा विषय होतो; परंतु आफ्रिकेमध्ये ८ हजार मुले भुकेने तडफडून मरतात, तिथे कोणाचेही लक्ष जात नाही. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर हजारो स्थलांतरित मजूर पायी चालत आपल्या गावाकडे निघाले. हे मजूर बेकार झाले होते. त्यांच्याकडे ना पुरेसे पैसे होते, ना पोट भरण्यासाठी पुरेसे अन्न. या स्थलांतरितांच्या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठीच राजीव बजाज यांनी आफ्रिकेतील मुलांच्या उदाहरणाचा सूचकतेने वापर केला. ते म्हणाले की, देशातील उद्योगजगतच नाही, तर सर्वसामान्य माणसेही केंद्र सरकारला वचकून राहातात. या सरकारविरोधात काही बोललो, तर आपल्यावर संकट कोसळेल, अशी भीती त्यांच्या मनात आहे. अशी स्थिती असूनही मी माझ्या मनातील विचार अत्यंत मोकळेपणाने मांडण्याचा निर्णय घेतला.
लोकांच्या मनातील भीती घालवा
प्रख्यात उद्योगपती राजीव बजाज यांनी सांगितले की, सर्वात प्रथम लोकांच्या मनातून भीती घालविली पाहिजे. या गोष्टीवर सर्वांनीच मोकळ्या मनाने विचार केला पाहिजे. मला वाटते देशातील जनता पंतप्रधानांचे ऐकते. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात असून, या आजाराला घाबरू नका, असे आता सरकारने लोकांना सांगण्याची गरज आहे. जगातील अनेक देशांनी जे आर्थिक पॅकेज जाहीर केले, त्यातील दोनतृतीयांश रक्कम जनतेला सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र, भारतात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधील फक्त १० टक्के रक्कमच लोकांच्या हाती पडणार आहे.)