उत्तर प्रदेशात सप-बसपविरुद्ध काँग्रेस-भाजपची युती : मायावती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:51 PM2019-05-02T15:51:43+5:302019-05-02T15:51:52+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी बहुजन समाजपक्षाची निर्मिती झाली आहे. भाजपने देखील काँग्रेसप्रमाणे नकली आंबेडकरवादी होण्याची उठाठेव सुरू केली आहे. ही उठाठेव भाजपने करू नये, असा सल्ला मायवती यांनी दिला.
नवी दिल्ली - बहुजन पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी गुरुवारी काँग्रेसवर कडाडून टीका केली. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि भाजप युती करून उत्तर प्रदेशात निवडणुकीला सामोरे जात असल्याचा आरोप मायवाती यांनी केला. एक सभेत त्या बोलत होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी बहुजन समाजपक्षाची निर्मिती झाली आहे. भाजपने देखील काँग्रेसप्रमाणे नकली आंबेडकरवादी होण्याची उठाठेव सुरू केली आहे. ही उठाठेव भाजपने करू नये, असा सल्ला मायवती यांनी दिला. तसेच बसप आणि सप युतीसंदर्भात काँग्रेसकडून देखील वाटेल ते वक्तव्य करण्यात येत आहे. यावरून काँग्रेस आणि भाजपने आपापसात युती केल्याची उघड होते, असंही मायावती यांनी म्हटले.
दरम्यान काँग्रेसचे लोक जनतेत जावून भाजप जिंकले तरी चालेल, पण बसप-सप जिंकायला नको, असं सांगत आहेत. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते असा प्रचार करत असल्याचे मायावती यांनी सांगितले. तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हटले की, उत्तर प्रदेशात काँग्रेसने मजबूत उमेदवारी दिले आहेत. सगळेच उमेदवार जिंकतील, काही जिंकू शकले नाही, तरी ते भाजपला नुकसान करतील, असंही प्रियंका यांनी सांगितले होते.
यावर मायवती म्हणाल्या की, काँग्रेसचे अधिकाअधिक उमेदवार भाजपला फायदा पोहचविण्यासाठीच आहे. तर सप-बसपचं रिमोट कंट्रोल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात असल्याचे बुधवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले होते.