२० सुत्री; इंदिराजींची अन् राहुलचीही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 12:10 PM2019-03-26T12:10:48+5:302019-03-26T12:11:35+5:30
१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी गरीबी हटविण्यासाठी २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याला मोठ्या प्रमाणात यशही आले होते.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा राहुल गांधींनी केली आहे. देशातील २० टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील 'गरिबी हटाव'चा नारा दिला होता. १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी गरीबी हटविण्यासाठी २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याला मोठ्या प्रमाणात यशही आले होते.
इंदिरा गांधी यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठरवून २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याचीच पुनरावृत्ती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करत नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इंदिरा गांधी यांच्या २० सुत्री कार्यक्रमात पुढील बाबींचा समावेश होता.
१. ग्रामीण भागातील गरीबी हटविणे
२. कृषी क्षेत्रासाठी वार्षिक रणनिती
३. सिंचन व्यवस्थेसाठी परिणामकारक योजना
४. उत्पादनात वाढ
५. जमीन सुधारणा प्रवर्तन
६. ग्रामीण मजुरांसाठी खास कार्यक्रम
७. स्वच्छ पिण्याचे पाणी
८. सर्वांसाठी आरोग्य
९. लोकसंख्या नियंत्रण
१०. शिक्षणाचा विस्तार
११. अनुसुचित जाती/ जमातींना न्याय
१२. महिलांसाठी समानता
१३. महिलांसाठी नवीन संधी
१४. सर्वांसाठी घर
१५. झोपडपट्टी सुधार
१६. व्यावसायासाठी रणनिती
१७. पर्यावरण संरक्षण
१८. ग्राहक समस्या सोडविणे
१९. प्रत्येक गावांत वीज
२०. जबाबदार प्रशासन
काय आहे, राहुल गांधी यांची योजना
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी ७२ हजार रुपये देण्यात येतील. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल. देशातील 5 कोटी कुटुंबांना, म्हणजेच जवळपास २५कोटी लोकांना याचा फायदा होईल, असा दावा राहुल गांधींना केला. जगातील कोणत्याही देशात अशी योजना नाही, असा दावादेखील त्यांनी केला. 'काँग्रेसनं जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन योजना तयार केली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास देशभरात टप्प्याटप्प्यात ही योजना लागू करण्यात येईल,' अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान इंदिरा गांधी यांच्या २० सुत्री कार्यक्रमामुळे सर्वसामान्यांच जीवनमान सुधारण्यास मदत झाली होती. तसेच या कार्यक्रमामुळे काँग्रेसला फायदाच झाला होता. आता राहुल यांनी केलेल्या घोषणेचा फायदा या निवडणुकीत काँग्रेसला होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.