सगळ्यांकडून काही तरी शिकतो, मोदींकडूनही एक गोष्ट शिकलो : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 03:34 PM2019-05-11T15:34:08+5:302019-05-11T15:36:06+5:30
कुणालाही विश्वासात न घेता मोदींनी देशात नोटबंदी लागू केली. चुकीच्या पद्धतीने देश चालवला. राफेल, जीएसटी किंवा नोटंबदीच्या मुद्दावर मोदींनी आपल्याशी जाहीर चर्चा करावी, असं आव्हानही राहुल यांनी दिले.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान बाकी असून विरोधकांसह सत्ताधारी देखील मीडिया फ्रेंडली होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांना मुलाखती देत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. त्याचवेळी त्यांच्याकडून एक गोष्ट आपण शिकल्याचं त्यांनी म्हटले आहे.
राहुल यांनी या मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तर दिली. मायावती यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राहुल म्हणाले की, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती देशाचं प्रतीक आहे. आमच्या पक्षाच्या नसल्या तरी मी त्यांचा आदर करतो. पॉलिटीकली आमची लढाई असली तरी त्यांच्याकडून मी शिकत आलो. मायावती, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, स्टॅलिन यांचं मोठ योगदान आहे. मी त्या सर्वांचा आदर करतो. एवढच काय मी मोदींच्या योगदानाचा देखील आदर करतो. त्यांकडून मी एक गोष्ट शिकलो. त्यांनी आपल्याला शिकवलं की, देशाला कशा पद्धतीने नाही चालवायच, असा मिश्कील टोला राहुल यांनी लागवला. मोदींनी कुणाचही न ऐकता नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे देशाच नुकसान झालं. नरेंद्र मोदींच कम्युनिकेश स्कील उत्तम असल्याचं देखील राहुल यांनी यावेळी सांगितले.
या मुलाखतीत राहुल यांनी मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयावर जोरदार टीका केली. कुणालाही विश्वासात न घेता मोदींनी देशात नोटबंदी लागू केली. चुकीच्या पद्धतीने देश चालवला. राफेल, जीएसटी किंवा नोटंबदीच्या मुद्दावर मोदींनी आपल्याशी जाहीर चर्चा करावी, असं आव्हानही राहुल यांनी दिले.
मागील पाच वर्षांपासून मोदींविरुद्ध काँग्रेसने लढा दिला आहे. मोदी सतत काँग्रेसवर हल्ला करतात, याचा अर्थ हाच होतो की काँग्रेसने मोदींना आव्हान दिले. आम्ही प्रत्येक आघाडीवर भाजपला झुंज दिल्याचे राहुल म्हणाले.
संकटकाळी आरएसएसच्या लोकांना मदत करेन
देशात आपण प्रेमाच राजकारण करणार आहोत. कुणाविषयी आपल्या मनात राग ठेवायचा नाही. राहुल गांधी कुणीच नाही. देशातील सर्वांच रक्षण करायचं. आरएसएसविरुद्ध विचारांची लढाई आहे. मात्र आरएसएसच्या लोकांवर संकट आल्यास आपण त्यांची देखील मदत करू, असं राहुल गांधी यांनी म्हटले.