राहुल गांधींचा हल्लाबोल; बॉक्सर पंतप्रधानांनी कोच अडवाणींनाच लगावला ठोसा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 11:40 AM2019-05-07T11:40:13+5:302019-05-07T11:42:54+5:30
पंतप्रधान मोदींच्या ५६ इंच छातीच्या वक्तव्याची खिल्ली उडवत राहुल गांधी म्हणाले की, २०१४ मध्ये जनतेने ५६ इंच छातीवाला बॉक्सर मैदानात उतरविला होता. या बॉक्सरसोबत भाजपचे अरुण जेठली नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज नेते होते. यामध्ये अडवाणी कोच अर्थात प्रशिक्षकाच्या भूमिकेत होते.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा जवळ आला असून या टप्प्यात निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगतदार होत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज शाब्दिक चकमक घडत आहे. अनेकदा वैयक्तीक टीकाही होत असतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लक्ष्य केले.
पंतप्रधान मोदींच्या ५६ इंच छातीच्या वक्तव्याची खिल्ली उडवत राहुल गांधी म्हणाले की, २०१४ मध्ये जनतेने ५६ इंच छातीवाला बॉक्सर मैदानात उतरविला होता. या बॉक्सरसोबत भाजपचे अरुण जेठली नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज नेते होते. यामध्ये अडवाणी कोच अर्थात प्रशिक्षकाच्या भूमिकेत होते. मोदींनी सांगण्यात आले होते की, मैदानात तुमची लढाई बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, आर्थिक आव्हानांशी आहे. मात्र मोदींनी या समस्या सोडून प्रशिक्षक असलेल्या अडवाणी यांच्याच तोंडावर ठोसा लगावला, असं राहुल यांनी म्हटले.
वास्तविक पाहता रिंगच्या बाहेर असलेल्या जनतेला अपेक्षा होती की, मोदी भ्रष्टाचाराला, बेरोजगारीला, शेतकऱ्यांचा समस्यांना पराभूत करतील, मात्र त्यांनी मुख्य स्पर्धक सोडून अडवाणींना बाजुला केले. अडवाणी देखील आश्चर्यचकित झाले की, हे काय झालं, अशी उपाहासात्मक टीका राहुल यांनी मोदींसह भाजपवर केली.
दरम्यान काँग्रेसकडूनलोकसभा निवडणूक 'चौकीदार चोर है' च्या घोषवाक्यावरून गाजविण्यात आली. त्याला भाजपने चोख प्रत्युत्तर देत दिवंगत पंतप्रधान आणि राहुल यांचे वडील राजीव गांधी यांच्यावरच टीका केली. त्यामुळे राजकारण आणखीनच तापले आहे.