मसूद अजहरला सोडणारं भाजपच; मोदींनी त्याचं उत्तर द्यावं : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 02:43 PM2019-05-04T14:43:48+5:302019-05-04T14:44:13+5:30
ज्या मसूद अजहरवर मोदी बोलत आहेत, त्याला काँग्रेसच्या काळात पकडण्यात आले होते. मात्र भाजपने त्याला कंधारपर्यंत नेऊन सोडले. यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी राहुल यांनी केली.
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मसूद अजहरच्या मुद्दावरून राहुल गांधी यांनी मोदींना जाब विचारला आहे. जागतिक पातळीवर मसूद अजहरला अतिरेकी घोषित करण्यात आल्यानंतर या घोषणेमुळे काँग्रेसच्या पोटात दुखत असल्याचे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी एका सभेत केले होते. त्याला राहुल गांधी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
राष्ट्रवादावर बोलताना राहुल म्हणाले की, २००४ मध्ये काश्मीर जळत होते. त्यावेळी काँग्रेसने तेथील परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. मात्र मोदींनी तेथील स्थिती खराब केली. काँग्रेसने अतिरेक्यांवर अंकूश ठेवला होता. ज्या मसूद अजहरवर मोदी बोलत आहेत, त्याला काँग्रेसच्या काळात पकडण्यात आले होते. मात्र भाजपने त्याला कंधारपर्यंत नेऊन सोडले. यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी राहुल यांनी केली.
राष्ट्रीय सुरक्षा देशासाठी महत्त्वाची आहे. यामध्ये काँग्रेसचा रेकॉर्ड उत्तम आहे. काश्मीरमधील आतंकवाद आम्ही रोखला. परंतु, मोदींनी आतंकवादासाठी देशाचे द्वार खुले करून दिले. मसूद अजहरला यांनीच सोडून दिले. त्यावर मोदी काहीच बोलत नाहीत. राष्ट्रीय सुरक्षेसह बेरोजगारी देखील देशासमोरची मोठी समस्या आहे. मोदींनी देशाला बेरोजगारीच्या खाईत ढकलले. त्यावर मोदींकडे काही उत्तर आहे का, असा सवाल राहुल यांनी केला.
मोदींचा पराभव निश्चित
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव होणार हा देशाचा आवाज आहे. मोदींनी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. ते शक्यही होते. मात्र आज देशात मागील ४५ वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक बेरोजगारी वाढली आहे. त्यांनी १५ लाखांचे आश्वासन दिले, पण ते देखील जुमला ठरले. आम्ही पाच वर्षांत ३ लाख ६० हजार, २२ लाख नोकऱ्या देणार आहोत. ही लढाई सत्याची आहे. आमच्या बाजूने सत्य आहे. त्यामुळे मोदींचा पराभव होणार असं, राहुल यांनी सांगितले.