शिख दंगलीविषयीच्या वक्तव्यावर पित्रोदांनी मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 10:44 AM2019-05-11T10:44:15+5:302019-05-11T12:22:35+5:30
नरेंद्र मोदींनी पाच वर्षांत काय केलं त्यावर बोलावे. ८४ मध्ये जे झालं ते झालं. मात्र यावरून वाद झाल्यानंतर पित्रोदा म्हणाले की, भाजप आपले अपयश लपविण्यासाठी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे.
नवी दिल्ली - १९८४ मध्ये झालेल्या शिखविरोधी दंगली संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सॅम पित्रोदा चारही बाजुनी फसले होते. पित्रोदा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने स्वत:ला वेगळे केले असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील पित्रोदा यांनी माफी मागावी असं मत जाहीर केले होते. त्यानंतर पित्रोदा यांनी जाहीर माफी मागितली आहे. तसेच खराब हिंदीमुळे आपल्या तोडून असं वक्तव्य निघाल्याचे ते म्हणाले.
सॅम पित्रादा जे बोलले, त्याचा पक्षाची काहीही संबंध नाही. त्यांनी त्यासाठी माफी मागावी. १९८४ मध्ये झालेली दंगल अत्यंत क्लेशदायी होती. घटनेतील पिडीतांसोबत न्याय व्हायला हवा. यासाठी जे लोक जबाबदार आहेत, त्यांना कठोर शिक्षा मिळावी. या घटनेसाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांनी माफी मागितली आहे. ती एक दुखद घटना होती, असंही राहुल यांनी सांगितले होते.
पित्रोदा म्हणाले होते की, आता ८४ च्या मुद्दा नाही. नरेंद्र मोदींनी पाच वर्षांत काय केलं त्यावर बोलावे. ८४ मध्ये जे झालं ते झालं. मात्र यावरून वाद झाल्यानंतर पित्रोदा म्हणाले की, भाजप आपले अपयश लपविण्यासाठी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे. मात्र माध्यमांमध्ये पित्रोदा यांचे वक्तव्य गाजत असल्याने वाद निर्माण झाला होता. अखेर पित्रोदा यांनी माफी मागितली.
दुसरीकडे राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने १९८४ मध्ये झालेल्या शिख दंगलीसंदर्भातील वक्तव्यावरून पित्रोदा यांना नोटीस बाजवली होती. तसेच या संदर्भात स्पष्टीकरण देऊन शिख समुदायाची माफी मागावी, असंही नोटीसमध्ये म्हटले होते.