राहुल गांधींच्या प्रचाराची जबाबदारी राजीव सातव यांच्या खांद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 05:13 PM2019-05-04T17:13:45+5:302019-05-04T17:16:05+5:30
अमेठीत प्रचारासाठी काही वेगळ करण्याची आवश्यकता नाही. अमेठी आणि रायबरेली मतदार संघ शेजारीच आहेत. हे दोन्ही मतदार संघ काँग्रेसचे पारंपरिक मतदार संघ आहेत. येथे विजय निश्चित असून किती मताधिक्य मिळणार हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे सातव म्हणाले.
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराची जबाबदारी माजी खासदार आणि मराठमोळे नेते राजीव सातव यांच्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीत गुजरात प्रभारीची जबाबदारी पार पाडल्यानंतर राजीव सातव अमेठीत दाखल झाले आहेत.
अमेठीत प्रचारासाठी काही वेगळ करण्याची आवश्यकता नाही. अमेठी आणि रायबरेली मतदार संघ शेजारीच आहेत. हे दोन्ही मतदार संघ काँग्रेसचे पारंपरिक मतदार संघ आहेत. येथे विजय निश्चित असून किती मताधिक्य मिळणार हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे सातव म्हणाले.
२०१४ मध्ये देखील हिंगोली मतदार संघाची निवडणूक आधीच झाली होती. त्यावेळी देखील मी प्रचारासाठी अमेठीत आलो होतो. राज्यातील स्थिती पाहता, भाजपचे सरकार असून केवळ प्रशासनाचा दुरुपयोग होण्याची शक्यता राजीव सातव यांनी व्यक्त केली.
दरम्यान अमेठीतील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्यासाठी अमित शाह यांचा रोड शो होणार आहे. यावर सातव म्हणाले की, २०१४ मध्ये शेवटच्या दिवशी नरेंद्र मोदी अमेठीत आले होते. यावेळी ते फिरकलेही नाहीत. अमित शाह यांना स्वत:च्या गांधीनगर मतदार संघात अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे शाह यांच्या रोड शोने अमेठीतील मतदारांवर परिणाम होईल याची सुताराम शक्यता नसल्याचे सातव यांनी सांगितले. गेल्या महिन्यातील २४ एप्रिलपासून राजीव सातव अमेठीत आहेत. अमेठी मतदार संघातील युपीएच्या काळातील कामे राज्यातील भाजप सरकारने रोखल्याचा आरोप यावेळी सातव यांनी केला आहे.
२०१४ मध्ये आम आदमी पक्षाचे कुमार विश्वास या मतदार संघातून उभे होते. त्यावेळी येथील लढत हाय प्रोफाईल झाली होती. आपचे अनेक नेते अमेठीत तळ ठोकून होते. आता कुमार विश्वास नाहीत. त्यातच भाजपची सध्याची देहबोली पाहता, त्यांनी पराभव मान्यच केला आहे, असंही सातव यांनी सांगितले.