मुख्यमंत्री गहलोत यांच्या १३० पैकी ९३ सभा मुलासाठी; पुत्रप्रेमपोटी मुख्यमंत्रीपद धोक्यात ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 12:54 PM2019-05-28T12:54:01+5:302019-05-28T13:08:41+5:30
काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत अशोक गहलोत यांनी चिरंजीव वैभव गहलोत यांना तिकीट मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर राहुल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर राजस्थान काँग्रेसमधील नेत्यांनी देखील पक्षाच्या पराभवानंतर काँग्रेसच्या राज्यातील पराभवासाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली - गेल्या वर्षी राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवून पुनरागमन करणाऱ्या काँग्रेसलाराजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीत खातं उघडण्यात देखील यश आले नाही. या पराभवाचे खापर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर फोडण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नाराज असून त्यामुळे गहलोत यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत अशोक गहलोत यांनी चिरंजीव वैभव गहलोत यांना तिकीट मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर राहुल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर राजस्थान काँग्रेसमधील नेत्यांनी देखील पक्षाच्या पराभवानंतर काँग्रेसच्या राज्यातील पराभवासाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. या घडामोडीनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट दिल्लीत मुक्कामी आहे. सोमवारी राहुल यांनी अशोक गेहलोत यांना भेटण्यासाठी वेळ दिला नव्हता. गहलोत यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव असल्याचे सांगण्यात येत आहे.
गहलोत यांचे चिरंजीव वैभव जोधपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री गहलोत यांनी देखील आपल्या १३० सभांपैकी ९३ सभा मुलासाठी घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राहुल गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.