राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 11:27 AM2024-05-12T11:27:43+5:302024-05-12T11:30:35+5:30
काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चेला तयार असल्याचे जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात प्रचारसभा सुरू आहेत. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. दरम्यान, काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच मंचावर चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले होते. यावर आता भाजपाने प्रत्यु्त्तर दिले आहे.
राहुल गांधी ट्विट करुन म्हणाले की, मला किंवा पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे लोकसभा निवडणुकीवरील सार्वजनिक चर्चेत भाग घेण्यास आनंद होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीही निमंत्रण स्वीकारतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाने लगेचच पलटवार करत राहुल गांधी हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का असा सवाल केला. निवृत्त न्यायाधीश मदन बी लोकूर, भारतीय कायदा आयोगाचे माजी अध्यक्ष अजित पी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन राम यांनी लिहिलेल्या पत्राला राहुल गांधींनी उत्तर दिले होते.
या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी दोन्ही नेत्यांना निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी एका व्यासपीठावर आमंत्रित केले होते. त्यांनी देशाच्या नेत्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, चर्चेचा प्रस्ताव हा पक्षविरहित आणि प्रत्येक नागरिकाच्या व्यापक हिताचा आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी काय म्हणाले?
"लोकशाहीसाठी प्रमुख पक्षांनी देशासमोर त्यांचे व्हिजन एका व्यासपीठावर मांडणे हा एक सकारात्मक उपक्रम असेल," असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 'देशाला आशा आहे की पंतप्रधान मोदी चर्चेत सहभागी होतील. मी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी निमंत्रणावर चर्चा केली आणि त्यांनी सहमती दर्शवली की अशा चर्चेत लोकांना आमचा दृष्टिकोन समजण्यास मदत होईल आणि पर्यायी मार्ग काढता येईल, असंही राहुल गांधी म्हणाले.
या आमंत्रणाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, "आपल्या पक्षांवर लावले जाणारे कोणतेही बिनबुडाचे आरोप थांबवणे देखील महत्त्वाचे आहे. निवडणूक लढवणारे प्रमुख पक्ष म्हणून, जनतेने त्यांच्या नेत्यांचे थेट ऐकणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मी, किंवा काँग्रेस अध्यक्षांना अशा चर्चेत सहभागी होण्यास आनंद होईल."
अर्थपूर्ण आणि ऐतिहासिक चर्चेत सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक असल्याचेही गांधी म्हणाले. पंतप्रधान सहभागी होण्यास सहमत आहेत का, त्यानंतर आम्ही चर्चेचे तपशील आणि स्वरूप यावर चर्चा करू, असंही राहुल गांधी म्हणाले.
भाजपचा पलटवार
तेजस्वी सूर्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या पत्रावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. 'ते काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही नाहीत, इंडिया आघाडीचा विषय सोडा. राहुल गांधी कोण आहेत ज्यांच्याशी पीएम मोदींनी वाद -विवाद करावा? राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही नाहीत, आधी त्यांना काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करायला लावा. त्यांनी आपल्या पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांना चर्चेसाठी निमंत्रण द्या, असे सांगावे. तोपर्यंत आम्ही आमच्या बीजेवायएमचे प्रवक्ते त्यांना कोणत्याही चर्चेत पाठवण्यास तयार आहोत, असंही तेजस्वी सूर्या म्हणाले.