काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 04:28 PM2024-05-06T16:28:16+5:302024-05-06T16:36:55+5:30
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील रतलाम-झाबुआ लोकसभा मतदारसंघांतर्गत अलीराजपूर जिल्ह्यातील जोबत शहरात एका निवडणूक रॅलीला संबोधित केले.
Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील रतलाम-झाबुआ लोकसभा मतदारसंघांतर्गत अलीराजपूर जिल्ह्यातील जोबत शहरात एका निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. 'भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सध्याच्या लोकसभा निवडणुकीत १५० जागाही मिळणार नाहीत आणि या निवडणुकांचा उद्देश संविधान वाचवणे हा आहे जे भाजपा आणि आरएसएस बदलू इच्छित आहेत, असंही गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस सरकार हे सुनिश्चित करेल की आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा लोकांच्या हितासाठी हटवली जाईल. जातीनिहाय जनगणनेतून लोकांच्या स्थितीबद्दल सर्व काही स्पष्ट होईल आणि देशातील राजकारणाची दिशा बदलेल. भाजप नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ते संविधान बदलणार आहेत. यावेळी त्यांनी ४०० पार करा असा नारा दिला आहे. ४०० सोडा, त्यांना १५० जागाही मिळणार नाहीत, असंही राहुल गांधी म्हणाले.
"ही लोकसभा निवडणूक संविधान वाचवण्यासाठी आहे, ज्याला भाजप आणि आरएसएस बदलू इच्छित आहेत, काँग्रेस आणि विरोधी पक्ष 'इंडिया' युती संविधानाचे रक्षण करत आहे. आदिवासी, दलित आणि ओबीसींना लाभ मिळतो हे संविधान आहे. "संविधानामुळेच आदिवासींना त्यांचे पाणी, जमीन आणि जंगलांवर अधिकार आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले.