इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 12:46 PM2024-05-15T12:46:19+5:302024-05-15T12:47:50+5:30
Lok Sabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. सात टप्प्यात मतदान होणार असून आता चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे.
Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : देशभरात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. सात टप्प्यात मतदान होणार असून आता चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. एनडीए विरोधात यावेळी विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडी केली आहे. इंडिया आघाडीने देशभरात एकत्र येत भाजपाविरोधात प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, आता पहिल्यांदाच इंडिया आघाडीला किती जागा मिळतील यावर काँग्रेस नेत्याने विधान केले आहे.
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला ३५० जागा मिळतील आणि नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष आशिष कुमार साहा यांनी केला आहे. असा मोठा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी पहिल्यांदाच केला आहे. साहा म्हणाले की, ४०० पार करण्याचा भाजपचा नारा पोकळ आहे. वास्तविक इंडिया आघाडीला ३५० जागा मिळतील आणि आम्ही नवीन सरकार स्थापन करू,असा दावा त्यांनी केला. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून परतणार नाहीत. इंडिया आघाडीला देशभरातून पाठिंबा मिळत आहे, असंही आशीष कुमार साहा म्हणाले.
साहा म्हणाले, 'भाजप चुकीची आश्वासने देऊन लोकांना मूर्ख बनवत आहे. ती आश्वासने पूर्ण करू शकलेली नाही. त्यामुळे या सरकारची हकालपट्टी करायचीच, असा निर्धार लोकांनी केला आहे. आता इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करायचे आहे. ३५० जागांवर विजय मिळवून इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल. यावर भाष्य करताना भाजपचे प्रवक्ते नबेंदू भट्टाचार्जी म्हणाले की, यावेळी ४०० पार करण्याचा नारा प्रत्यक्षात येईल कारण आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे. इंडिया आघाडीचे नेते सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत असतील तर आम्हाला काही अडचण नाही.
त्रिपुरामध्ये सीपीएम आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पक्ष राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीसोबत आहेत. त्रिपुरामध्ये पूर्व त्रिपुरा आणि पश्चिम त्रिपुरा या दोन जागा आहेत. पश्चिम त्रिपुरा लोकसभा जागेसाठी आशिष साहा स्वतः रिंगणात असून त्यांची लढत राज्याचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्याशी आहे. तर पूर्व त्रिपुरामध्ये भाजप उमेदवार कृतीदेवी देबबर्मा आणि सीपीआयएमचे आमदार राजेंद्र रेआंग यांच्यात आहे.