'ममतांनी INDIA' साठी खुले केले बंद दरवाजे! काँग्रेसला दिली ऑफर, पण केवळ या ठिकाणी अडकलंय प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 11:05 PM2024-02-22T23:05:32+5:302024-02-22T23:06:21+5:30
यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सर्व लोकसभा जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला जागावाटपाची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी I.N.D.I.A. साठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली भूमिका काहीशी मवाळ केली आहे. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सर्व लोकसभा जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला जागावाटपाची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, टीएमसीने पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला दोन जागांवर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. तसेच, मेघालय आणि आसाममध्ये टीएमसी प्रत्येकी एक-एक जागेवर निवडणूक लढेल. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये मेघालयातील तुरा (Tura) जागेसंदर्भात चर्चा अडकलेली आहे. ही जागा टीएमसीला देण्यास काँग्रेसचा नकार असल्याचे बोलले जात आहे.
टीएमसी मेघालयातील तुरा मतदारसंघाची मागणी करत आहे. यासाठी ते 2019 च्या निवडणुकीचा हवाला देत आहेत. गेल्या 2019 च्या निवडणुकीत या जागेवर काँग्रेसला 9 टक्के मते मिळाली होती, भाजपला 13 टक्के, टीएमसीला 28 टक्के तर एमएमपीला 40 टक्के मते मिळाली होती. यामुळे, या जागेवर तृणमूल काँग्रेसने निवडणूक लढवायला हवी, असे टीएमसीचे म्हणणे आहे.