नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस; २९ एप्रिलपर्यंत उत्तर मागवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 01:38 PM2024-04-25T13:38:58+5:302024-04-25T13:40:56+5:30
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. देशभरात प्रचार जोरदार सुरू आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचे देशभरात दौरे सुरू आहेत. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली असून २९ एप्रिलपर्यंत उत्तर मागवले आहे.
Rahul Gandhi : "पराभवाच्या भीतीने थरथरत आहेत नरेंद्र मोदी"; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित आचारसंहिता उल्लंघनाची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप केला होता. आयोगाने २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे.
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या, विशेषतः स्टार प्रचारकांच्या वर्तनाची प्राथमिक जबाबदारी घ्यावी लागेल. उच्च पदावरील लोकांच्या प्रचार भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होतात. नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ७७ अंतर्गत 'स्टार कॅम्पेनर'चा दर्जा देणे हे पूर्णपणे राजकीय पक्षांच्या कक्षेत आहे आणि स्टार प्रचारकांनी उच्च दर्जाच्या भाषणात योगदान देणे अपेक्षित आहे.
काही दिवसापूर्वी, राजस्थानमधील बांसवाडा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास ते घुसखोर आणि ज्यांना जास्त मुले आहेत त्यांच्यामध्ये देशाची संपत्ती वाटू शकते. पीएम मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसने प्रत्युत्तरात म्हटले की, पंतप्रधानांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांनी निवडणूक आयोगाकडे या मुद्द्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.