राहुल आणि प्रियंका गांधी या मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक, UP-बिहारमधील ४० जागांवर काँग्रेसचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 04:55 PM2024-02-15T16:55:21+5:302024-02-15T16:56:39+5:30
Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेश आणि बिहारमधील किमान ३० ते ४० जागांवर काँग्रेसकडून दावेदारी ठोकण्यात आली आहे. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे मतदारसंघही काँग्रेसकडून निश्चित करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये इंडिया आघाडीमध्ये होणाऱ्या जागावाटपाला आता नवं वळण लागण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील किमान ३० ते ४० जागांवर काँग्रेसकडून दावेदारी ठोकण्यात आली आहे. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे मतदारसंघही काँग्रेसकडून निश्चित करण्यात आले आहेत. राहुल गांधी रायबरेली येथून तर प्रियंका गांधी अमेठी येथून स्मृती इराणी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. येत्या एक दोन दिवसांमध्याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बिहारमधील सुमारे १५ ते २० जागांवर काँग्रेसकडून महाआघाडीमध्ये दावेदारी करण्यात आली आहे. या जागांवर तारिक अन्वर, अखिलेश प्रसाद सिंह, कन्हैया कुमार, शकील अहमद खान आणि राज्यसभा खासदार रंजीत रंजन या नेत्यांना लढवलं जाण्याची शक्यता आहे.
इंडिया आघाडीतील बदलत्या समिकरणांदरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस नेत्यांनी जागावाटपाबाबत नव्याने चर्चा सुरू केली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनुक्रमे आरएलडी आणि जेडीयूने साथ सोडल्यानंतर कांग्रेसला अधिका जागा मिळाल्या पाहिजेत, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे. दरम्यान, काँग्रेसने समाजवादी पक्षाकडे आपल्या २० उमेदवारांच्या नावांची यादी सोपवली आहे, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील अमेठी, राय बरेली, कानपूर, बलिया, बाराबंकी, मेरठ, महाराजगंज, रामपूर, सहारनपूर, झाशी, फतेहपूर सिक्री, जालौन, बासगांव आणि बिजनौरसारख्या जागांवर दावा केला आहे. जागावाटपाबाबत राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. सध्या केवळ ५ ते ६ जागांवरच सहमती बनली आहे. मात्र काँग्रेस आणि सपामध्ये १५ ते २० जागांवर एकमत होईल, असं बोललं जात आहे.
त्याचप्रमाणे भाजपाने बिहारमध्येही १५ ते २० जागांवर दावेदारी केली आहे. काँग्रेसकडून सुपौल, सासाराम, समस्तीपूर, मधुबनी, दरभंगा, बेगुसराय, पूर्ण चंपारण्य, पटना साहिब, झंझारपूर, किशनगंज, औरंगाबाद, गोपालगंज, कटिहार आमि अररिया या जागांसाठी काँग्रेस आणि आरजेडीमध्ये चर्चा सुरू आहे.