अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:26 AM2024-05-13T11:26:18+5:302024-05-13T11:27:47+5:30
Lok Sabha Election 2024 : केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.
Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची देशभरात रणधुमाळी सुरू आहे. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एका वृत्तवाहिनील विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यावेळी अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीच्या मध्यावर विरोधकांवर मुस्लिमांचा मुद्दा आणल्याचा आरोप केला. अमित शहा म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनीच निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा पुढे केला आहे. ते म्हणत आहेत की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यामुळे आम्ही पीओकेबद्दल बोलू नये. अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का?, असा सवालही अमित शाह यांनी केला.
अमित शहा म्हणाले, आम्ही अजिबात बोललो नाही. विरोधक आम्ही मुस्लिम पर्सनल लॉवर बोलू, असे म्हणत आहेत. हा त्यांचा अजेंडा आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याने त्यांनी त्यांचा आदर करावा, असे त्यांचे नेते सांगत आहेत. फारुख अब्दुल्ला म्हणत आहेत की, पीओकेबद्दल बोलू नका, कारण त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. १३० कोटी लोकसंख्येच्या बलाढ्य देशाने अणुबॉम्बच्या भीतीने आपला प्रदेश सोडावा का?, असंही अमित शाह म्हणाले.
या मुलाखतीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाच सवाल केले आहेत.
१) राहुल गांधी यांना तिहेरी तलाक परत आणायचा आहे का?
२)त्यांचा सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास आहे का?
३) ते 370 हटवण्याचे समर्थन करतात का?
४) राहुल गांधी यांनी मुस्लिम पर्सनल लॉबाबत त्यांचे मत स्पष्ट करावे.
५) ते जनतेला सांगतील का की ते राम मंदिराच्या दर्शनाला का गेले नाहीत? , हे प्रश्न विचारण्यात आले आहेत.