'या' राज्यात भाजपला मोठा झटका बसणार...! सर्वच्या सर्व 39 जागांवर जिंकू शकते I.N.D.I.A.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 03:15 PM2024-04-15T15:15:21+5:302024-04-15T15:17:46+5:30
Lok Sabha Chunav Survey : या सर्वेक्षणात, पंतप्रधानांच्या कामावर किती लोक समाधानी आहेत, असा प्रश्न करण्यात आला, यावर 51 टक्के लोकांनी खूप अधिक, 24 टक्के लोकांनी कमी, 23 टक्के लोकांनी असमाधानी तर 2 टक्के लोकांना माहिती नाही असे उत्तर दिले.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. भाजप, काँग्रेससह सर्वच पक्ष कंबर कसून प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते रोज वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणूक सभा घेत आहेत. यातच, नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात भाजपला तामिळनाडूमध्ये मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार तामिळनाडूतील सर्वच्या सर्व जागा विरोधी पक्ष इंडिया अलायन्सच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.
सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या एकूण 39 जागा आहेत, यांपैकी काँग्रेसला 9 आणि द्रमुक तथा आघाडीला 30 जागा मिळू शकतात. भाजपच्या खात्यात एक जागा जाण्याचाही अंदाज नाही. महत्वाचे म्हणजे, येथे द्रमुक हा I.N.D.I.A.चा भाग आहे.
मात्र, या निवडणूक सर्वेक्षणातील महत्वाचे गोष्ट म्हणजे, भाजपच्या मतांची टक्केवारी लक्षणीय वाढणार असल्याचे दिसते. तामिळनाडूमध्ये एनडीएला 19 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर I.N.D.I.A. ला 52 टक्के, AIMDAK 23 टक्के आणि इतरांना 6 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
या सर्वेक्षणात, पंतप्रधानांच्या कामावर किती लोक समाधानी आहेत, असा प्रश्न करण्यात आला, यावर 51 टक्के लोकांनी खूप अधिक, 24 टक्के लोकांनी कमी, 23 टक्के लोकांनी असमाधानी तर 2 टक्के लोकांना माहिती नाही असे उत्तर दिले. याशिवाय, राहुल गांधींच्या कामावर किती समाधानी आहात? असा प्रश्न केला असता, यावर 41 टक्के लोकांनी आपण असमाधानी असल्याचे म्हटले आहे. तर 23 टक्के लोकांनी आपण खूप समाधानी असल्याचे सांगितले. 19 टक्के लोकांनी कमी, असे उत्तरे दिली, तर 17 टक्के लोकांना माहित नाही, असे उत्तर दिले.