Yogi Adityanath : "आजीपासून नातवापर्यंत..."; योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर जोरदार पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 11:56 AM2024-04-23T11:56:03+5:302024-04-23T12:05:23+5:30
Lok Sabha Election 2024 Yogi Adityanath And Rahul Gandhi : योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गरीबीवरील विधानांवर भाष्य केलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गरीबीवरील विधानांवर भाष्य केलं आहे. राहुल गांधींच्या विधानावर योगी आदित्यनाथ म्हणाले की, "काँग्रेसने 6 दशकांहून अधिक काळ राज्य केलं आणि आजीपासून नातवापर्यंत एकच घोषणा देऊन देशातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम केलं आहे."
"गरीबी हटावची घोषणा, काँग्रेसने 1970 च्या दशकात दिली होती, पण गरीबी कधीच हटवली गेली नाही. काँग्रेसने 6 दशकांहून अधिक काळ राज्य केलं आणि आजीपासून नातवापर्यंत देशातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम याच घोषणेच्या जोरावर केलं."
"इंडिया आघाडीने जनतेची दिशाभूल करू नये. या लोकांनी समाजात सामाजिक वैमनस्य वाढवले. माझा अंदाज आहे की, पुढील सहा टप्प्यांमध्ये भाजपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा आणि कामाचा आशीर्वाद मिळेल" असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
"काँग्रेसची वाईट नजर आता बहिणी आणि मुलींच्या दागिन्यांवर असून हे लोक त्यावर डल्ला मारण्याचं काम करणार आहेत. काँग्रेसचे हे घराणं जेव्हा सुपर पीएम झाले होते, तेव्हा मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते, ज्यांच्या सांगण्यावरून ते म्हणाले होते की, देशाच्या संसाधनांवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. तुम्हाला देश अल्पसंख्याक आणि बहुसंख्य असा विभागायचा आहे का?"
"देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजेत, कारण गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक गरीबीतून, दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत" असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.