लोकसभा निवडणूक; काँग्रेसचे मिशन ३००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:31 AM2018-07-23T00:31:54+5:302018-07-23T00:32:29+5:30
कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधींना सर्वाधिकार
नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आक्रमक पद्धतीने मैदानात उतरणार असून, किमान ३०० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ज्येष्ठ नेते
पी. चिदम्बरम यांनी १२ राज्यांतील १५० जागांवर काँग्रेसला विजय मिळू शकतो, असा दावा केला.
या निवडणुकांसाठी कोणत्या पक्षांशी आघाडी करायची, याचे सर्वाधिकार कार्यकारिणीने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना दिले. देशाच्या १२ राज्यांमध्ये काँग्रेसला चांगला जनाधार आहे. आणखी ताकद लावली, तर तिथे किमान १५० जागा मिळू शकतील, असे चिदम्बरम यांनी बैठकीनंतर सांगितले. आपण १५० जागा जिंकल्यास यूपीएची केंद्रात सत्ता येणे शक्य आहे, कारण यूपीएमधील अन्य राष्ट्रीय प्रादेशिक पक्ष आणखी १५० जागा सहज जिंकू शकतील, असा विश्वास त्यांनी बैठकीत व्यक्त केला.
शोषित-पीडितांसाठी काँग्रेसने लढा देणे गरजेचे आहे, असे आवाहन राहुल गांधी यांनी या बैठकीत केले, तर मोदी सरकारचे आता रिव्हर्स काऊंटडाऊन सुरू झाले आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले. नरेंद्र मोदी निराश आहेत. तसे त्यांच्या शब्दबंबाळ भाषणांतूनही दिसून येत आहे, असेही त्या म्हणाल्या.
दलित, आदिवासी, मागासवर्गीय, गरीब, विविध यंत्रणा व घटनात्मक संस्था यांच्यावर भाजपा पद्धतशीरपणे हल्ले चढवत आहे, असल्याचा आरोप करून राहुल गांधी म्हणाले, की काँग्रेसच हा भारताचा खरा आवाज (व्हॉइस आॅफ इंडिया) आहे. पक्षाच्या मतदारांचा पाया विस्तारणे हे आपल्यापुढील महत्त्वाचे लक्ष्य आहे. ज्यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसला मते दिली नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांचा विश्वास संपादन करा, असा संदेशही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला.
जुमले रचण्यात मोदी दंग
मोदी आत्मस्तुती व निवडणूक जुमले रचण्यात कायम दंग असल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून दाखवण्याच्या मोदी यांच्या दाव्याचा फोलपणा दाखवून देताना ते म्हणाले की, त्यासाठी कृषी क्षेत्राचा दर १४ टक्के हवा. पण तो दृष्टिक्षेपातच नाही.