आधी गळाभेट अन् आता हँडशेक...नवीन संसदेत दिसली मोदी-राहुल यांची अनोखी केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 05:03 PM2024-06-26T17:03:58+5:302024-06-26T17:04:58+5:30

18 व्या लोकसभेत विरोधकांचे संख्याबळ वाढल्याने सभागृहातील नेत्यांमधील केमिस्ट्री बदलली आहे.

Lok Sabha Election : First a hug and now a handshake, Modi-Rahul's unique chemistry was seen in the new Parliament | आधी गळाभेट अन् आता हँडशेक...नवीन संसदेत दिसली मोदी-राहुल यांची अनोखी केमिस्ट्री

आधी गळाभेट अन् आता हँडशेक...नवीन संसदेत दिसली मोदी-राहुल यांची अनोखी केमिस्ट्री

Lok Sabha Election : काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुका पार पडल्या अन् देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील NDA चे सरकार स्थापन झाले. पण, या 18व्या लोकसभेचे चित्र 2014 आणि 2019 च्या लोकसभेपेक्षा वेगळे असणार आहे. त्याची झलक बुधवारी(दि.26) लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी दिसून आली. या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष संख्याबळाच्या बाबतीत पूर्वीच्या तुलनेत कमकुवत झाला आहे, त्यामुळे विरोधकांनाही एक नवसंजिवणी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपद झाल्यामुळे विरोधकांमध्ये वेगळीच उर्जा आली आहे. त्यामुळेच आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील केमिस्ट्रीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, आज भाजप नेते ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर सभागृहात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाली. लोकसभा अध्यक्षांना त्यांच्या स्थानापर्यंत नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उठले आणि त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही बोलावले. यावेळी दोन्ही नेत्यांनी हसत-हसत एकमेकांना हस्तांदोलन केले. एकमेकांवर अतिशय टोकाची टीका करणाऱ्या नेत्यांनी आपुलकीने हस्तांदोलन केल्यामुळे साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या. आता आगामी काळात या दोन्ही नेत्यांमधील केमिस्ट्री पाहण्यासारखी असेल.

यापूर्वी राहुल गांधींनी मोदींना मिठी मारलेली
राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात असे चित्र क्वचितच पाहायला मिळते. बुधवारी सभागृहात राहुल आणि मोदींनी हस्तांदोलन केल्यानंतर अनेकांना जुलै 2018 ची घटना आठवली. सुमारे सहा वर्षांपूर्वी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी सभागृहात बसलेल्या पंतप्रधान मोदींना थेट मिठी मारली होती. त्यावेळी राहुल यांनी सभागृहात जोरदार भाषणही केले होते. आपल्या भाषणात ते देशातील द्वेषाच्या वातावरणावर बोलत होते. यावेळी प्रेमाचा संदेश देण्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना मिठी मारली. मात्र, त्यावेळी राहुल गांधींच्या या कृतीची सत्ताधाऱ्यांनी खिल्ली उडवली होती. 

संख्याबळाने चित्र बदलले
राजकारणात नेत्यांची सर्वात मोठी ताकद त्यांच्या पक्षाचे खासदार आणि आमदार असतात. या संख्यात्मक ताकदीच्या जोरावरच नेता सर्वोच्च पदावर पोहोचतो. त्या आधारावर त्यांची लोकप्रियता आणि गांभीर्य ठरवले जाते. ही संख्या कमी असेल, तर त्यांची प्रतिमा कमकुवत नेत्याची बनते. हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 100 टक्के लागू होते. गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेस खासदारांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना फार गांभीर्याने घेतले जात नव्हते. पण, आता विरोधकांची पॉवर वाढल्यामुळे त्यांना गांभीर्याने घेतले जाणार आहे.
 

Web Title: Lok Sabha Election : First a hug and now a handshake, Modi-Rahul's unique chemistry was seen in the new Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.