तब्बल 58 वर्षानंतर गुजरातमध्ये होतेय काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 02:17 PM2019-03-12T14:17:27+5:302019-03-12T14:18:59+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 58 वर्षानंतर गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत
अहमदाबाद - काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 58 वर्षानंतर गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये होत असलेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त होतंय. या बैठकीत केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर विशेष चर्चा केली जाणार आहे.
LIVE: Congress President @RahulGandhi attends prayer meeting at Gandhi Ashram, Sabarmati, Ahmedabad. #GandhiMarchesOnhttps://t.co/xfEGjaxaNk
— Congress (@INCIndia) March 12, 2019
निवडणूक प्रचार करताना विरोधकांकडून नोटाबंदीमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेला कसा फटका बसला, नोटाबंदीचा सर्वाधित फटका व्यापारांना बसल्यामुळे गुजरातमध्ये नोटाबंदीच्या निर्णय हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असू शकतो. नोटाबंदी निर्णयाचा विरोधाचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारणी बैठकीत मांडला जाणार असून त्याचसोबत जीएसटी, शेतकऱ्यांची अवस्था, बेरोजगारी असे विविध मुद्दे काँग्रेस कार्यकारणीत बैठकीत चर्चा केली जाईल.
On the anniversary of Gandhi Ji’s historic Dandi March, the Congress Working Committee in Ahmedabad, resolved to defeat the RSS/ BJP ideology of fascism, hatred, anger & divisiveness. No sacrifice is too great in this endeavour; no effort too little; this battle will be won. pic.twitter.com/w6PhAIbYMs
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 12, 2019
काँग्रेस कार्यकारणी समिती बैठकीच्या एक दिवसआधीच गुजरातमधील जामनगर(ग्रामीण) भागाचे काँग्रेस आमदार वल्लभ धारविया यांनी आमदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. मागील तीन दिवसांमध्ये तीन आमदारांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ हाती घेतलं आहे. 2017 पासून आत्तापर्यंत काँग्रेसच्या 5 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर एका काँग्रेस आमदाराची नियुक्ती निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांची संख्या 77 वरुन 71 पर्यंत पोहचली आहे.
पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
मागील काही दिवसांपासून हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये सहभागी होणार अशी चर्चा सुरू होती या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. स्वत: हार्दिक पटेल यांनी राहूल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. जामनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून हार्दिक पटेल निवडणूक लढू शकतात.
पंतप्रधान व भाजपा अध्यक्ष यांच्या राज्यातून काँग्रेस प्रचाराचा नारळ फोडणार
काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनिती काँग्रेसच्या बैठकीत ठरणार असून 1961 नंतर पहिल्यांदा काँग्रेसची कार्यकारणी बैठक गुजरातमध्ये होत आहे. 1961 मध्ये गुजरातच्या भावनगरमध्ये ही बैठक झाली होती.