चौकीदार भडकले, काँग्रेस-भाजपाविरोधात केली निवडणूक आयोगात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 12:53 PM2019-03-28T12:53:09+5:302019-03-28T13:01:01+5:30
राजकीय फायद्यासाठी चौकीदार या शब्दाचा वापर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी करत असल्याची तक्रार पंजाबमधील लाल झेंडा पेंडू चौकीदार युनियनने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार रंगत असताना यामध्ये चौकीदार या शब्दाचा प्रचारात मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी चौकीदार या शब्दाचा वापर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी करत असल्याची तक्रार पंजाबमधील लाल झेंडा पेंडू चौकीदार युनियनने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेसकडून चौकीदार चोर है तर भाजपाकडून मै भी चौकीदार ही मोहीम प्रचारात वापरली जात आहे याला चौकीदार युनियन आक्षेप घेतला असून या दोन्ही राजकीय पक्षांवर कारवाई करण्याची मागणी चौकीदारांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी देशाचा पंतप्रधान नसून चौकीदार आहे असं वारंवार प्रचारात सांगत असतात त्याला काँग्रेसने प्रत्युत्तर देत वेगवेगळी भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून चौकीदार चोर है ही मोहीम भाजपाच्या विरोधात सुरु केली. ही मोहीम इतकी प्रभावी ठरली त्यामुळे विरोधी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांकडून चौकीदार चोर है असे संदेश सोशल मिडीयावर व्हायरल झाले. काँग्रेसच्या चौकीदार चोर है या घोषणेमुळे चौकीदारांची प्रतिमा खराब झाल्याचा आरोप पेंडू चौकीदार युनियनचे परमजीत सिंह यांनी करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.
पंतप्रधान मोदींसह भाजपचे सर्वच नेते झाले "चौकीदार"
पूर्ण रात्रभर जागून आपला जीव धोक्यात घालून महिन्याकाठी चौकीदार सरासरी 4 ते 5 हजार रुपये कमवतो. काँग्रेसकडून चौकीदार चोर है यावर गाणंही तयार करण्यात आलं आहे हे गाणं सोशल मिडीयावर व्हायरल होतंय. तसेच पंतप्रधान महिन्याला लाखो रुपये कमवतात आणि स्वत:ला चौकीदार म्हणवतात. मात्र खरा चौकीदार आपल्या पोटापाण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतो अशी टीका परमजीत सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
निवडणुकीच्या प्रचारात कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल करारात घोटाळ्याचे आरोप करत, ‘देश का चौकीदार चोर है’ असा उल्लेख केला होता. राहुल गांधींनी केलेल्या या टीकेला भाजपाने मै भी चौकीदार अशा टॅगलाईनने प्रत्युत्तर दिले. इतकचं नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भाजपाच्या सर्व मंत्र्यांनी, आमदार, खासदारांनी आपल्या नावापुढे चौकीदार शब्दाचा उल्लेख केला आहे.