अब की बार 280 पार; एनडीएची सत्तावापसी होणार- सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 09:36 AM2019-03-19T09:36:29+5:302019-03-19T09:41:31+5:30
एनडीए, यूपीएला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी वाढण्याचा अंदाज
नवी दिल्ली: येत्या लोकसभा निवडणुकीत एनडीए सत्ता कायम राखेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. टाईम्स नाऊ-व्हीएमआर यांनी केलेल्या सर्वेक्षणातून याबद्दलची आकडेवारी समोर आली आहे. यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला 283 जागा मिळू शकतील. तर काँग्रेसप्रणित यूपीएला 135 आणि इतरांना 125 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एनडीएच्या जागा कमी होताना, तर यूपीएच्या जागा वाढताना दिसत आहेत.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा एनडीएला मिळालेल्या मतांचा टक्का वाढेल असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 38.5 टक्के मतं मिळाली होती. यंदा एनडीएला 40.1 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे यूपीएला मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीतदेखील चांगली वाढ होऊ शकते. गेल्या निवडणुकीत यूपीएला 23 टक्के मतं मिळाली होती. यंदा त्यांना 30.6 टक्के मतं मिळू शकतात. या सर्वेक्षणात 17 हजार लोकांचा सहभाग होता, अशी माहिती टाईम्स नाऊ-व्हीएमआर यांनी दिली.
हिंदी भाषिक पट्ट्यात एनडीएला मोठं यश मिळेल, असा अंदाज आहे. याशिवाय ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्येही एनडीएला चांगलं यश मिळू शकतं. भाजपालामध्य प्रदेशात 29 पैकी 22, राजस्थानात 25 पैकी 20 आणि छत्तीसगडमध्ये 11 पैकी 6 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे तीनच महिन्यांपूर्वी या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. या तिन्ही राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेसला फारसं यश मिळण्याची शक्यता नाही. काँग्रेसला मध्य प्रदेशात 7, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 5 जागा मिळतील, असा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात सपा-बसपाच्या आघाडीमुळे भाजपाच्या जागा घटतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात सपा-बसपाला 36 जागांवर, तर एनडीएला 42 जागा मिळू शकतील.