विरोधकांच्या तक्रारी असताना माजी राष्ट्रपतींकडून निवडणूक आयोगाचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 12:02 IST2019-05-21T11:58:48+5:302019-05-21T12:02:24+5:30
नियुक्त करण्यात आलेले आयुक्त उत्तम काम करत आहेत. तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकत नाहीत. निवडणुकीचे काम योग्य दिशेने झाल्याचे मुखर्जी यांनी म्हटले.

विरोधकांच्या तक्रारी असताना माजी राष्ट्रपतींकडून निवडणूक आयोगाचे कौतुक
नवी दिल्ली - देशातील लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून निवडणूक आयोगावर अनेकदा पक्षपातीपणा केल्याचे आरोप करण्यात आला आहेत. तर अनेकदा सत्ताधाऱ्यांना सॉफ्ट कॉर्नर दिल्याचे आरोप झाले. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या कामाचे कौतुक केले आहे. दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
देशाचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्यापासून सध्याच्या निवडणूक आयुक्तांच्या चांगल्या कामामुळे निवडणूक आयोगाने चांगले काम केले. नियुक्त करण्यात आलेले आयुक्त उत्तम काम करत आहेत. तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकत नाहीत. निवडणुकीचे काम योग्य दिशेने झाल्याचे मुखर्जी यांनी म्हटले. मुखर्जी यांचे हे वक्तव्य अशावेळी आले जेंव्हा विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या कामावर टीका करण्यात येत आहे. देशाचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्यापासून आताच्या निवडणूक आयुक्तांनी उत्तम काम केल्यामुळेच लोकशाही सुरक्षीत राहिली असल्याची पुष्टी यावेळी माजी राष्ट्रपतींनी जोडली.
मुखर्जी यांच्या वक्तव्याच्या एक दिवस आधीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग पक्षपात करत असल्याचा आरोप केला होता. राहुल यांनी ट्विट करून म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर निवडणूक आयोगाने लोटांगण घेतले असून निवडणूक आयोग पूर्वीसारखे निष्पक्ष राहिले नसल्याचे त्यांनी नमूद केले होते.
निवडणूक आयोग पंतप्रधान मोदींच्या बाजुने असल्याचा आरोप विरोधक करत होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा आचारसंहितेचे उल्लंघन केल्यानंतर देखील त्यांनी क्लीनचीट देण्यात आले होते. त्यावर निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांनी आयोगाच्या बैठकीत सामील होण्यास नकार दर्शविला होता, असंही त्यांनी सांगितले.