Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 05:34 PM2024-05-02T17:34:04+5:302024-05-02T17:42:06+5:30
Lok Sabha Elections 2024 Amit Shah And Congress : अमित शाह यांनी गुरुवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. पक्षाचे 'राजपुत्र' राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रे'ने निवडणूक प्रचाराची सुरुवात केली होती, परंतु त्याचा समारोप हा येत्या 4 जून रोजी 'काँग्रेस ढूंढो यात्रे'ने होईल असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. बरेलीमधून भाजपाचे उमेदवार छत्रपाल गंगवार यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी असं म्हटलं आहे.
"आमच्यासमोर ही घमंडीया आघाडी निवडणूक लढवत आहे. त्यांचे राजपुत्र राहुलबाबा यांनी भारत जोडो यात्रेने निवडणुकीची सुरुवात केली. पण आज मी बरेलीला सांगून जात आहे की त्यांची सुरुवात 'भारत जोडो' यात्रेने झाली होती पण 4 जूननंतर तिचा 'काँग्रेस ढूंढो' यात्रेने समारोप होणार आहे. दोन टप्प्यातील निवडणुकीत काँग्रेस दुर्बिणीतूनही दिसत नाही आणि नरेंद्र मोदी शतक ठोकून 400 च्या शर्यतीत खूप पुढे गेले आहेत" असा दावा अमित शाह यांनी केला आहे.
"ही निवडणूक नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणार आहे. ही निवडणूक आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक म्हणजे तीन कोटी लखपती दीदी निर्माण करण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्याची निवडणूक आहे" असंही म्हटलं आहे.
अयोध्येत राम मंदिर उभारणीचा संदर्भ देत गृहमंत्र्यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवरही टीका केली. त्यांनी आरोप केला की, "70 वर्षांपासून काँग्रेस पक्ष राम मंदिराचा मुद्दा रखडवत होतं, पुढे ढकलत होतं. तुम्ही नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान केलं, त्यानंतर पाच वर्षांतच मोदींनी केस जिंकली, भूमिपूजन केलं आणि 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा करून जय श्री रामचा जयघोष केला."
"समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, त्यांची पत्नी डिंपल, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे मंदिर बांधकाम ट्रस्टने पाठवलेल्या निमंत्रणानंतरही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत कारण त्यांना त्यांच्या 'व्होट बँके'ची भीती होती. जर तिथे गेलो तर मतं मिळणार नाहीत. त्याच्याकडे कोणती व्होट बँक आहे हे तुम्हाला माहीत आहे ना?"
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप करत अमित शाह म्हणाले की, "अखिलेशजी यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि सोनियाजी यांना त्यांचा मुलगा राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. जे आपल्या मुलाला, मुलीला, पत्नीला, भावाला, पुतण्याला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री बनवण्यासाठी राजकारणात आहे, ते बरेलीच्या तरुणांचं भलं कसं करू शकतात? गरीब कुटुंबातून आलेले नरेंद्र मोदीच त्यांचं भलं करू शकतात."