Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 12:20 PM2024-05-02T12:20:03+5:302024-05-02T12:39:12+5:30
Lok Sabha Elections 2024 And Uma Bharti : उमा भारती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "सोनिया गांधी अजूनही स्वत:ला राणी आणि राहुल यांना राजकुमार समजतात" असं म्हणत निशाणा साधला आहे. मध्य प्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थनार्थ शिवपुरीच्या पिछोर येथे आयोजित जाहीर सभेत उमा भारती यांनी असं म्हटलं आहे.
"देश स्वतंत्र झाला आहे, परंतु सोनिया गांधी आणि राहुल गांधी अजूनही स्वतःला राणी आणि राजकुमार समजतात. हे दोघेही भ्रष्टाचार प्रकरणात जामिनावर आहेत. काँग्रेसने भूतकाळात अशा चुका केल्या आहेत की आता त्याबद्दल काही बोलणेही योग्य नाही" असं म्हणत उमा भारती यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
"काँग्रेसने आपल्या राजवटीत देशाला अडचणीत आणण्याचं काम केलं. काँग्रेसने देशात आणीबाणी लावली आणि सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले. देशातील शीख दंगली केल्या, या सर्व काँग्रेसच्या कारवाया आहेत. काँग्रेसने भूतकाळात इतक्या चुका केल्या आहेत की, आज काँग्रेसबद्दल बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही. देशातील जनतेला काँग्रेसबद्दल सर्व माहिती आहे" असंही उमा भारती यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, "भारताला विश्वगुरू म्हणून स्थापित करण्याचे आणि देशाच्या विकासाला गती देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक घरातील प्रत्येक मतदाराने सात मे रोजी मतदानासाठी यावे आणि भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद द्यावा."