'आमचे सरकार आल्यावर एका झटक्यात गरिबी हटवणार', राहुल गांधींचा मोठा दावा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 06:19 PM2024-04-11T18:19:17+5:302024-04-11T18:19:47+5:30
Lok Sabha Elections 2024: राहुल गांधींनी पीठ, डाळ, दूध, तेल, पेट्रोल, गॅसच्या किमती पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला.
Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध आश्वासने दिली जातात. अशातच, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशातील नागरिकांना एक मोठे आश्वासन दिले. गुरुवारी (11 एप्रिल, 2024) ईद-उल-फित्रच्या निमित्ताने, राहुल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमधून सरकारवर निशाणा साधला.
या पोस्टमध्ये राहुल गांधींनी पीठ, डाळ, दूध, तेल, पेट्रोल, गॅस, डॉलरच्या जुन्या(काँग्रेस सरकारच्या काळातील) आणि आताच्या(मोदी सरकारच्या काळातील) किमती लिहिल्या. तसेच, काँग्रेसचे सरकार आल्यावर गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी एक लाख रुपये देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले..
जनता को ‘बड़ी महंगी पड़ी मोदी सरकार’!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 11, 2024
- आटा ₹20 से ₹40 किलो
- दाल ₹80 से ₹210 किलो
- दूध ₹30 से ₹66 लीटर
- तेल ₹52 से ₹150 लीटर
- पेट्रोल ₹66 से ₹97 लीटर
- डीजल ₹52 से ₹90 लीटर
- रसोई गैस ₹410 से ₹1,103
- और डॉलर ₹58 से ₹83
इस कमरतोड़ महंगाई में, रिकॉर्ड तोड़… pic.twitter.com/8BgfTvAADr
'महागाईत आणि बेरोजगारी, यामुळे सर्वसामान्यांना दुहेरी फटका बसतोय. हेच आज देशासमोरचे दोन मोठे प्रश्न आहेत. प्रसारमाध्यमे हे लपवण्याचा प्रयत्न करताहेत. 'मोदी की बात' दाखवून महत्वाचा मुद्दा लपवला जातोय. भाजप सरकारचे सत्य जनतेसमोर येऊ नये म्हणून हे केले जात आहे. नरेंद्र मोदी आपले 'रिपोर्ट कार्ड' देशापासून लपवत आहेत. आम्ही गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला एक लाख रुपये, म्हणजेच दरमहा साडेआठ हजार रुपये देऊन गरिबीच्या दलदलीतून बाहेर काढू. ही काँग्रेसची हमी आहे', असे राहुल यांनी या पोस्टमध्ये म्हटले.
एका झटक्यात गरिबी हटवू...
राहुल गांधींनी या पोस्टसोबतच 56 सेकंदांची व्हिडिओ क्लिपही शेअर केली, ज्यामध्ये ते राजस्थानच्या बिकानेरमध्ये एका जाहीर सभेत बोलताना दिसतात. 'देशातील सर्वात मोठा मुद्दा कोणता? 90 टक्के लोक म्हणतील बेरोजगारी आणि महागाई. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर, तुम्ही दारिद्र्यरेषेखाली असाल, तर तुमच्या बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये (दरमहा आठ हजार पाचशे रुपये) येत राहतील आणि एका झटक्याने भारतातून गरिबी हटवू,' असा दावा त्यांनी यावेळी केला.