रामललाच्या दर्शनानंतर अमेठी-रायबरेलीतून उमेदवारीची घोषणा?; राहुल-प्रियंका यांच्याबाबत काँग्रेसचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:56 AM2024-04-25T10:56:24+5:302024-04-25T11:07:36+5:30
Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi And Priyanka Gandhi : राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र यावेळी सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोन हायप्रोफाईल जागांवर आहे.
देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात केरळमधील वायनाडमध्येही मतदान होणार आहे. या जागेवरून राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र यावेळी सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोन हायप्रोफाईल जागांवर आहे.
या दोन्ही जागांसाठी 26 एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या जागांवर उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी प्रियंका आणि राहुल अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेऊ शकतात, असं म्हटलं जात आहे.
या दोन्ही जागांवरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी निवडणूक लढवू शकतात, असे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या दोन्ही जागांची औपचारिक घोषणा 30 एप्रिलपूर्वी होणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या दोन जागांवर राहुल आणि प्रियंका यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत काँग्रेस नेत्यांनीही काहीही सांगितलेले नाही.
अमेठी आणि रायबरेलीला जाण्यापूर्वी राहुल आणि प्रियंका अयोध्येला जाऊ शकतात, तिथे त्यांना रामललाचे दर्शन घेता येईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने संकेत दिले आहेत की, जर राहुल आणि प्रियंका यांनी या जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर 1 आणि 3 मे रोजी या जागांवर उमेदवारी अर्ज भरता येतील.
अमेठीतून निवडणूक लढवण्यासाठी राहुल गांधी यांच्या टीमने अमेठीत तळ ठोकला आहे. राहुल गांधी यांच्या उमेदवारीसाठी यूपी काँग्रेस संघाला एक मे ही संभाव्य तारीख देण्यात आली आहे. काँग्रेस एक मे रोजी अमेठीत शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 एप्रिलच्या निवडणुकीनंतर राहुल गांधी 27 एप्रिलला अमेठीला पोहोचण्याची शक्यता आहे. अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या पारंपारिक जागा आहेत. राहुल गांधी दोन वेळा अमेठीतून लोकसभेचे खासदार राहिले आहेत, तर सोनिया गांधी या रायबरेलीतून सातत्याने विजयी होत आहेत.
2019 च्या निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मोदी सरकारमधील मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, वायनाडमधून निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठी लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या पाच जागा आहेत.
2019 मध्ये सोनिया गांधी यांनी ही आपली शेवटची लोकसभा निवडणूक असल्याचे जाहीर केले होते. 1999 मध्ये काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा अमेठीतून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी रायबरेलीमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. सोनिया गांधी एकूण पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या. सोनियांनी रायबरेलीसोबतचे अनेक दशकांचे कौटुंबिक संबंध सोडून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या खूपच भावूक झाल्या होत्या.