"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 07:59 PM2024-05-29T19:59:59+5:302024-05-29T20:00:37+5:30
Mani Shankar Remarks: काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी 1962 च्या भारत-चीन युद्धाबाबत केलेल्या वक्तव्याने काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे.
Jairam Ramesh On Mani Shankar Aiyar Remark:काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर (Mani Shankar Aiyar) यांनी चीनच्या भारतावरील आक्रमणाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावरुन भाजप काँग्रेसवर जोरदार टीका करत आहे, तर काँग्रेसने अय्यर यांच्या वक्तव्यापासून पक्षाला दूर ठेवले आहे. आता काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनीदेखील अय्यर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आणि त्यांचा आमचा संबंध नसल्याचे म्हटले.
#WATCH | Delhi: On Congress leader Mani Shankar Aiyar's remark, Congress leader Jairam Ramesh says, "Who is Mani Shankar Aiyar? He is not an official, he is a former MP and a former minister. He speaks whatever he wants in his personal capacity. We have nothing to do with it...… pic.twitter.com/KGlzLxcQP6
— ANI (@ANI) May 29, 2024
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जयराम रमेश म्हणाले, "मणिशंकर अय्यर कोण आहेत? ते पक्षाचे अधिकृत प्रवक्ते नाहीत. ते फक्त माजी खासदार, माजी मंत्री आहेत. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हवं ते बोलू शकतात, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. मीडिया, भाजपची ट्रोल आर्मी आणि सोशल मीडिया प्रकरण उचलून धरलंय. आज त्यांचा काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध नाही. ते काँग्रेस पक्षात आहेत, पण ते खासदारही नाहीत," अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली.
एका एक्स पोस्टमध्ये काँग्रेस सरचिटणीस म्हणतात, मणिशंकर अय्यर यांनी चुकून 'कथित हल्ला' हा शब्द वापरल्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे. यावेळी जयराम रमेश यांनी मणिशंकर अय्यर यांच्या वाढत्या वयाचाही हवाला दिला आणि 20 ऑक्टोबर 1962 रोजी चीनने भारतावर केलेला हल्ला खरा होता, असेही म्हटले. यावेळी त्यांनी भाजपवर चीनला क्लीनचीट दिल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, मे 2020 च्या सुरुवातीला लडाखमध्ये चिनी घुसखोरी झाली, ज्यामध्ये आपले 20 सैनिक शहीद झाले. पण, 19 जून 2020 रोजी पंतप्रधान मोदींनी सार्वजनिकरित्या चीनला क्लीन चिट दिली, ज्यामुळे आपली वाटाघाटीची स्थिती कमकुवत झाली आणि त्यामुळेच डेपसांग आणि डेमचोकसह 2000 चौरस किमी क्षेत्र भारतीय सैन्याच्या कक्षेबाहेर गेले, असा दावाही त्यांनी केला.
भाजपची जोरदार टीका
भाजपचे आयटी विभाग प्रमुख अमित मालवीय यांनी अय्यर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसवर टीका केली. त्यांनी पोस्ट केले की, "हा 'सुधारणावाद'चा निर्लज्ज प्रयत्न आहे. नेहरुंनी चीनच्या बाजूने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचा दावा सोडला, राहुल गांधींनी गुप्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, राजीव गांधी फाऊंडेशनने चिनी दूतावासाकडून पैसे घेतले आणि चीनी कंपन्यांसोबत काम केले. सोनिया गांधींच्या यूपीएने भारतीय बाजारपेठ चिनी वस्तूंसाठी खुली केली, ज्यामुळे एमएसएमईला धक्का बसला आणि आता काँग्रेस नेते अय्यर यांना चीनच्या आक्रमणाचा पुरस्कार करत आहेत. तेव्हापासून चीनने बेकायदेशीरपणे 38,000 चौरस किलोमीटर भारतीय भूभागावर कब्जा केला. यातून काँग्रेसचे चीनी प्रेम दिसते," अशी टीका त्यांनी केली.
काय आहे प्रकरण ?
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी 'नेहरुज फर्स्ट रिक्रुट्स' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना 1962 च्या युद्धाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपकडून काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 1962 मध्ये चीनने भारतावर 'कथित' हल्ला केला होता, असे अय्यर म्हणाले. 'कथित' या शब्दाचा वापर केल्यामुळे अय्यर आणि काँग्रेस भाजपच्या निशाण्यावर आले. पण, वाद वाढल्यानंतर त्यांनी निवेदन जारी करुन माफीदेखील मागितली.