उद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 07:53 PM2018-12-13T19:53:04+5:302018-12-13T19:57:55+5:30
नोटाबंदीच्या विषयावरून विरोधक सातत्याने भाजपावर टीका करतात. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आहेत.
नवी दिल्लीः नोटाबंदीच्या विषयावरून विरोधक सातत्याने भाजपावर टीका करतात. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आहेत. या टीकेवरून विरोधकांचा समाचार घेताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना हळूच कोपरखळी मारली.
नवी दिल्लीत झालेल्या 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह'मध्ये इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या विषयावरून प्रश्न विचारला. नोटाबंदीचा फटका भाजपाला बसतोय, हा विरोधकांचा दावा योग्य आहे का, असं त्यांनी विचारलं. तेव्हा, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केलेली नोटाबंदी जनतेनं स्वीकारली आहे. सामान्यांची त्याबद्दल कुठलीही तक्रार नाही. म्हणूनच नोटाबंदीनंतर पुढच्या दीड वर्षांत झालेल्या सगळ्या निवडणुका भाजपाने जिंकल्या. केवळ काही मोठ्या लोकांना त्यामुळे त्रास झाला, तेच त्याविरोधात ओरडत आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांना टोलवलं. त्यावर, अत्यंत चतुराईनं रजत शर्मा यांनी त्यांना शब्दांत पकडण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे बडे है या चिल्ला रहे है मुझे पता नही... असं म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना पेचात टाकलं. परंतु, वो बडे भी है और चिल्ला भी रहे है, असं देवेंद्र फडणवीस हसत हसत म्हणाले.
नोटाबंदीमुळे कॅशलेस व्यवहारांना चालना मिळाली, देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली, रिअल्टी सेक्टरमधील काळा पैसा नियंत्रणात आला, याकडे लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन केलं.