राहुल गांधी की रॉबर्ट वाड्रा हा नवा ट्विस्ट; अमेठी व रायबरेलीचा सस्पेन्स संपणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 05:54 AM2024-04-26T05:54:47+5:302024-04-26T05:55:13+5:30
वायनाडमध्ये मतदान पार पडल्यावरच काँग्रेस आपले पत्ते उघड करेल
ललित झांबरे
लखनाै : साऱ्या देशाचे ज्या दोन जागांकडे लक्ष आहे त्या उत्तर प्रदेशातील अमेठी व रायबरेली मतदारसंघातून आता काँग्रेस लवकरच आपले उमेदवार जाहीर करेल, असा अंदाज आहे.
गेल्यावेळी राहुल गांधी यांना पराभूत केलेल्या स्मृती इराणी पुन्हा एकदा अमेठीतून भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर, भाजपने रायबरेलीतून अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यावर तेसुद्धा लगेच उमेदवार जाहीर करतील, असे अपेक्षित आहे. वायनाडमध्ये मतदान पार पडल्यावरच काँग्रेस आपले पत्ते उघड करेल. चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठीच राहुल यांनी आधीच अमेठीतून उमेदवारी जाहीर करणे टाळले आहे.
‘या’ उमेदवारावर डोळा
केसरगंजमधून कुस्तीगीर महासंघातील विवादामुळे चर्चेत आलेले भाजप खासदार ब्रिजभूषण चरणसिंह यांना पुन्हा संधी मिळणार का, याबद्दल अनिश्चितता आहे. त्यांचे तिकीट कापले गेल्यास ते समाजवादी पार्टीत जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. ह्या शक्यतेवर डोळा ठेवून सपानेसुद्धा अद्याप येथून उमेदवार जाहीर केलेला नाही.
अमेठीत रंगले पोस्टरवॉर
दोन दिवसांपासून अमेठीत रॉबर्ट वाड्रा यांचे पोस्टर झळकले आहेत. त्यामुळे काँग्रेस अमेठीतून वाड्रा यांना मैदानात उतरवते की काय अशी, चर्चा सुरू झाली आहे. भाजपने वाड्रा यांना लक्ष्य केल्याने ही चर्चा नक्कीच निराधार नाही.