यूपी-दिल्लीचे जागावाटप ठरले, पण महाराष्ट्र अन् पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससमोर मोठा पेच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 01:49 PM2024-02-25T13:49:11+5:302024-02-25T13:50:50+5:30
बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिला आहे, तर महाराष्ट्रातही अद्याप काही निर्णय होऊ शकलेला नाही.
LokSabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधआरी भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. याच दिशेने काँग्रेस एक-एक पक्षाला सोबत आणण्याचा प्रयत्न करत आहे. समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यात काँग्रेसला यश आले, पण त्यांच्या अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसला मोठी कसरत करावी लागत आहे.
पश्चिम बंगालमध्ये वाद...
पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे मन वळवण्यात काँग्रेसला यश आले नाही. अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये TMC प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिला होता, त्यामुळए काँग्रेसच्या अडचणी वाढत आहेत. असे मानले जाते की, काँग्रेसने टीएमसीकडे सुमारे 10 जागा मागितल्या होत्या, परंतु ममता फक्त दोन जागा देण्यास तयार आहेत. अद्याप जागांबाबत एकमत झालेले नाही. अधीर रंजन सातत्याने टीएमसीवर निशाणा साधत आहेत, त्यामुळेही जागावाटपाबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. या वादामुळे ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला हजेरी लावली नव्हती. अशातच काँग्रेस ममता बॅनर्जींची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे.
महाराष्ट्राची काय आहे परिस्थिती..?
महाराष्ट्रातही महाविकासआघाडीने अद्याप जागावाटपाचा आराखडा जाहीर केलेला नाही. काँग्रेस, शिवसेना (बाळासाहेब उद्धव ठाकरे) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी यांच्यात चर्चा अंतिम टप्प्यात आहे. जागांच्या गोंधळावर राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंशीही चर्चा केली असून, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभेच्या सहापैकी तीन जागांवर काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे, तर उद्धव ठाकरेंना मुंबईसह लोकसभेच्या 18 जागांवर निवडणूक लढवायची आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय होणऊ शकतो.