दक्षिणेसह उत्तरेकडे काँग्रेसला चांगल्या निकालाची अपेक्षा; रणनीती यशस्वी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 04:54 PM2024-05-31T16:54:50+5:302024-05-31T16:55:43+5:30
loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता काही दिवसच शिल्लक आहे. परंतु तत्पूर्वी काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
नवी दिल्ली - गेल्या २ निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला यंदा चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. मागील निवडणुकीत ज्या राज्यात काँग्रेसनं चांगले यश मिळवलं त्या राज्यासह उत्तरेकडील काही राज्यात काँग्रेस मोठी अपेक्षा ठेवून आहे. मागच्या निवडणुकीत उत्तरेकडील राज्यात काँग्रेस केवळ १-२ जागांवर विजयी झाली होती. त्याठिकाणी यंदा जागा वाढतील असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे. राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा त्यामागचं प्रमुख कारण ठरेल असं काँग्रस नेते सांगतात. पण काँग्रेसनं पहिल्यांदाच इतिहासात ३२७ इतक्या कमी जागांवर निवडणूक लढवली आहे.
दक्षिणेकडे काँग्रेस मजबूत
२०१४ मध्ये काँग्रेस प्रणित यूपीए सरकारला देशात उत्तरेकडील राज्यांनी नाकारलं होतं तेव्हा दक्षिणेतील राज्यांनी काँग्रेसची लाज राखली. त्यावेळी ४६४ जागा लढणाऱ्या काँग्रेसला एकूण ४४ जागांवर विजय मिळाला. ज्यात कर्नाटकातील ९ आणि केरळमधील ८ जागांचा समावेश होता. नुकतेच ज्या तेलंगणात काँग्रेसचं सरकार बनलं तिथे केवळ २ जागा पक्षाला जिंकता आल्या होत्या. तर तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पक्षाला खातेही उघडता आलं नाही.
दुसरीकडे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसनं ४२१ जागांवर निवडणूक लढली. त्यातील ५२ जागा जिंकल्या. तेव्हा कर्नाटकात १ जागेवर तर केरळात १५ जागांवर काँग्रेस विजयी झाली तर आंध्र प्रदेशनं काँग्रेसला पुन्हा निराश केले होते. मागील निवडणुकीत तामिळनाडूत ८, तेलंगणात १ जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला केरळ आणि तामिळनाडू येथे पुन्हा तशीच कामगिरीची अपेक्षा आहे. तर तेलंगणा, कर्नाटक याठिकाणी काँग्रेस सरकार आहे. त्यामुळे या राज्यात काँग्रेसच्या जागा वाढण्याचा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे.
उत्तरेकडे काँग्रेसला आशावाद
काँग्रेसची नजर यावेळी अशा राज्यांवर आहे जिथं मागील निवडणुकीत त्यांना विजयाचं खाते उघडता आले नाही. गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसारख्या राज्यात मागील २ निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला. तर छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश, यूपी आणि महाराष्ट्र याठिकाणी काँग्रेस केवळ १-२ जागांवर जिंकली. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, हरियाणा आणि छत्तीसगड या राज्यांकडून काँग्रेसला मोठी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस यंदा चांगली कामगिरी करेल असं मानलं जातं. त्याचप्रमाणे गुजरात, हरियाणा, राजस्थानात पक्षाचे उमेदवार जिंकू शकतात असं नेत्यांना वाटतं. हरियाणात शेतकरी नाराजी, महिला पैलवानांमधील असंतोष, जातीय समीकरणे यातून सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी आहे. उत्तर प्रदेशात यंदा समाजवादी पक्षासोबत काँग्रेस रिंगणात आहे. बिहारमध्ये आरजेडीसोबत काँग्रेसनं आघाडी केली आहे. झारखंडमध्येही हेमंत सोरेन यांच्या अटकेची सहानुभूती आघाडीला मिळेल असं काँग्रेसला वाटतं.
काँग्रेसची रणनीती यशस्वी होणार?
काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. त्यामागे खास रणनीती आहे. याच रणनीतीतून काँग्रेसनं संपूर्ण निवडणूक लढवली. महागाई, बेरोजगारी, संविधान वाचवण्याची लढाई यासारख्या मुद्द्यावर जनतेत जात लोकांशी निगडीत मुद्द्यापासून प्रचार कुठेही भरकटला जाऊ नये यासाठी काँग्रेसनं काळजी घेतली. यंदा काँग्रेसनं अजेंडा सेट केला होता. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी पक्षांवर आक्रमक प्रचार सुरू होता. काँग्रेसनं प्रसिद्ध केलेला जाहिरनामा आणि त्यातील ५ सामाजिक न्याय आणि २५ गॅरंटी यावरून ते जनतेत गेले. त्यामुळे काँग्रेसला आत्मविश्वास वाढला आहे. आता त्यांची ही रणनीती कितपत यशस्वी होणार हे ४ जूनच्या निकालातून स्पष्ट होईल.