विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत गैरहजर; नाराज असल्याच्या चर्चांवर नितीशकुमारांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 05:31 PM2023-07-19T17:31:03+5:302023-07-19T17:31:34+5:30
बंगळुरुमध्ये झालेल्या विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नितीशकुमार, लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव गैरहजर होते.
LokSabha INDIA vs NDA : मंगळवारी(दि.18) बंगळुरुमद्ये विरोधकांची दुसरी बैठक झाली. त्या बैठकीत विरोधी ऐक्याला INDIA हे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना हे नाव आवडले नाही, त्यामुळेच त्यांनी बैठकीनंतर तात्काळ काढता पाय घेतला आणि संयुक्त पत्रकार परिषदेत हजर राहिले नाही, अशा चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाल्या. या सर्व चर्चांवर अखेर नितीश कुमारांनी मौन सोडले आहे.
संबंधित बातमी- 'ही NDA vs INDIA ची लढाई; आमचा लढा विचारधारेविरोधात', राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
नितीश कुमार बुधवारी(दि.19) बिहारच्या राजगीर शहरात होते. इथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना नितीश म्हणाले, 'काल विरोधी पक्षांची बैठक झाली. ती बैठक झाल्यावर मी तात्काळ निघालो. आता बातम्या येताहेत की, मी नाराज असल्यामुळे पत्रकार परिषदेत हजर झालो नाही. पण, बैठकीत माझ्या समोरच सगळ्या गोष्टी ठरवण्यात आल्या होत्या. मला लवकर राजगीरला यायचे होते, म्हणून मी निघालो. आम्ही सर्व एकत्रच आहोत.'
माध्यमांमध्ये वेगळीच चर्चा
बैठकीत नितीश कुमारांनी I.N.D.I.A. नावावर तीव्र आक्षेप घेतला. काँग्रेसने ही आघाडी हायजॅक केल्याने जेडीयू तसेच लालूंचा पक्ष आरजेडीमध्ये नाराजी पसरली आणि याच कारणामुळे नितीश, लालू आणि तेजस्वी बंगळुरुहून पाटण्याला रवाना झाले. नाराजीमुळेच ते बैठकीनंतर विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रकार परिषदेला हजर नव्हते. इंग्रजी नावावर त्यांचा आक्षेप आहे, अशाप्रकारची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली. पण, आज अखेर नितीश कुमारांनी यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.
संबंधित बातमी- विरोधकांची पुढील बैठक मुंबईत; दिल्लीत उभारणार सचिवालय, 'INDIA' नावावर एकमत, खर्गेंची माहिती