मध्य प्रदेशात भाजपाने साडेचार हजार मतांनी सत्ता, तर काँग्रेसने अवघ्या २ हजार मतांनी बहुमत गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 06:38 AM2018-12-15T06:38:29+5:302018-12-15T06:38:57+5:30

१० मतदारसंघांमध्ये जय-पराजयात एक हजारापेक्षा कमी मतांचा फरक

In Madhya Pradesh, the BJP has lost 4.5 percent votes and Congress has lost a majority of just 2,000 votes | मध्य प्रदेशात भाजपाने साडेचार हजार मतांनी सत्ता, तर काँग्रेसने अवघ्या २ हजार मतांनी बहुमत गमावले

मध्य प्रदेशात भाजपाने साडेचार हजार मतांनी सत्ता, तर काँग्रेसने अवघ्या २ हजार मतांनी बहुमत गमावले

Next

- अमोल मचाले 

पुणे : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाली. २३० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने ११४, तर भाजपाने १०९ जागा जिंकल्या. यापैकी १० मतदारसंघांमध्ये विजयी आणि पराभूत उमेदवारांत एक हजारापेक्षा कमी मतांचे अंतर होते. या १० ठिकाणी दोन्ही प्रमुख पक्षांना मिळालेली मते पाहता भाजपानेमध्य प्रदेशातील सत्ता अवघ्या साडेचार हजार मतांनी गमावल्याचे, तर काँग्रेसचे बहुमत फक्त २ हजार मतांनी हुकल्याचे दिसते.

या १० पैकी ७ ठिकाणी भाजपा उमेदवारांना पराभूत करून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. भाजपासाठी धक्कादायक बाब म्हणजे, या सातही मतदारसंघांत मिळून विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील मतांचा फरक अवघ्या ४ हजार ३३७ मतांचा आहे. म्हणजे, या ठिकाणी सुमारे साडेचार हजारांच्या घरात मते भाजपाला मिळाली असती तर, या पक्षाला १०९ ऐवजी ११६ जागा म्हणजे काठावरचे बहुमत मिळून शिवराजसिंह यांनी विजयाचा चौकार लगावला असता.

दुसरीकडे, १० पैकी ३ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार भाजपा उमेवारांकडून एक हजारापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले. त्याचा एकूण फरक १ हजार ८६३ मतांचा आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून काँग्रेस उमेवारांनी सुमारे २ हजार मते जादा घेतली असती तर त्यांच्या जागा ११४ वरून ११७ वर गेल्या असत्या. म्हणजे, या पक्षाने बहुमताला आवश्यक ११६ पेक्षा एक जागा जास्त जिंकली असती. मात्र, येथे दोन हजार मते कमी मिळाल्याने काँग्रेसचे बहुमत हुकले.

दोन्ही पक्षांना ‘नोटा’चा फटका
ज्या ७ ठिकाणी भाजपा उमेदवार एका हजारापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले, त्यापेक्षा किती तरी जास्त मतदारांनी 'नोटा'चा पर्याय स्वीकारला.
सातही ठिकाणी मिळून भाजपा उमेदवारांच्या पराभवाच्या अंतराची बेरीज ४,३३७ असताना तेथे तब्बल १४,३५८ मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबले.
काँग्रेसलाही ‘नोटा’चा फटका बसला. ज्या ३ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार एक हजारापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले (एकूण बेरीज १८३३ मते), तेथे ४,७१२ मतदारांना विधानसभेत आपले प्रतिनिधित्व करावे, इतपत पात्र उमेदवार कोणीच न वाटल्याने त्यांनी ‘नोटा’ला पसंती दिली.
म्हणजेच, ज्या १० ठिकाणी एक हजारापेक्षा कमी मतांनी निकाल लागला तेथे ६,२०० मते निर्णायक ठरली. या तुलनेत तिपटीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल १९,०७० मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबले.

...तर ‘टाय’ झाला असता
१० मतदारसंघांतील जय-पराजयाचे अंतर बघता गमावलेल्या ७ ठिकाणी मिळून भाजपाने सुमारे साडेचार हजार मते घेतली असती आणि दुसरीकडे पराभूत झालेल्या ३ ठिकाणी मिळून काँग्रेसने सुमारे २ हजार मते घेतली असती, तर भाजपाने ११३ आणि काँग्रेसने ११० जागा जिंकल्या असत्या. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला समर्थन देणार नाही, असे निवडणुकीआधीच जाहीर करणाऱ्या बसपा (२) आणि सपा (१) यांनी काँग्रेसला साथ दिली असती तर ही निवडणूक टाय (प्रत्येकी ११३ जागा) झाली असती.

२०१३पेक्षा भाजपाचा ‘वोट शेअर’ ३.८७ टक्क्यांनी घसरला
२०१३ मध्ये भाजपाने शिवराजसिंह यांच्या नेतृत्वाखाली विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली होती. तेव्हा भाजपाने एकूण मतदानाच्या ४४.८७ टक्के मतांसह तब्बल १६५ जागा जिंकल्या होत्या. ३६.३८ टक्के मते आणि जागा मात्र ५८ अशी निराशाजनक कामगिरी काँग्रेसने केली होती. २०१३च्या तुलनेत यंदा भाजपाला ४१ टक्के म्हणजे ३.८७ टक्के मते कमी मिळाली. जागा मात्र ५६ ने घटल्या. दुसरीकडे, २०१३ पेक्षा यंदा काँग्रेसने ४०.९ म्हणजे ४.५२ टक्के मते जादा घेतली. त्यांच्या जागांत ५६ने वाढ होऊन हा पक्ष सत्तेवर आला.

Web Title: In Madhya Pradesh, the BJP has lost 4.5 percent votes and Congress has lost a majority of just 2,000 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.