कमलनाथ यांचा यू टर्न; आता वाजत गाजत म्हटलं जाणार वंदे मातरम्
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 03:17 PM2019-01-03T15:17:45+5:302019-01-03T15:19:14+5:30
'वंदे मातरम्'ला आकर्षक स्वरुप देण्याचा सरकारचा प्रयत्न
भोपाळ: राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांना वंदे मातरम् म्हणण्यास मनाई करणाऱ्या मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारनं यू टर्न घेतला आहे. उलट सरकारनं 'वंदे मातरम्'ला अधिक आकर्षक स्वरुप देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच सामान्य जनतादेखील वंदे मातरम् गायनात सहभागी होऊ शकेल. याशिवाय पोलीस बँडसोबत राष्ट्रगीत म्हटलं जाईल.
मध्य प्रदेशच्या सचिवालयात गेल्या अनेक वर्षांपासून वंदे मातरम् गायलं जातं. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रगीत म्हटलं जायचं. मात्र काँग्रेस सत्तेत आल्यानंतर ही परंपरा खंडित झाली. 1 जानेवारीला वंदे मातरम् गाण्यात आलं नाही. त्यामुळे विरोधी पक्षात असलेल्या भाजपानं सरकारवर निशाणा साधला. 'काँग्रेसला राष्ट्रगीताची शब्द रचना माहीत नसेल किंवा राष्ट्रगीत म्हणण्यात लाज वाटत असेल, तर त्यांना मला तसं सांगावं. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मी वल्लभ भवनाच्या प्रांगणात सर्वसामान्य जनतेसोबत वंदे मातरम् म्हणेन,' अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर शरसंधान साधलं होतं.
भाजपानं जोरदार विरोध केल्यानंतर कमलनाथ सरकारनं घूमजाव केलं. आता प्रत्येक महिन्याच्या कार्यालयीन कामाच्या पहिल्या दिवशी सकाळी पावणे अकरा वाजता पोलीस बँड भोपाळमधील शौर्य स्मारक ते वल्लभ भवनपर्यंत मार्च करेल. यानंतर वल्लभ भवनजवळ वंदे मातरम् आणि राष्ट्रगीत म्हटलं जाईल. यामध्ये सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि सर्वसामान्य जनतादेखील सहभागी होईल. दर महिन्याच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी वंदे मातरम् गाण्याची परंपरा 2005 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांनी सुरू केली होती.