मध्य प्रदेशमधील सरकार कुणाच्या आदेशावरून पाडले गेले? ऑडियो क्लीपमधून झाला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 04:02 PM2020-06-10T16:02:17+5:302020-06-10T23:56:08+5:30
कमलनाथ सरकार पाडण्यामागे नेमकी कुणी भूमिका बजावली आणि ते नेमके कुणाच्या आदेशावरून पाडले गेले याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप तेव्हापासून सुरू आहेत. आता याबाबत मोठा गौप्यस्फोट करणारी एक ऑडियो क्लीन व्हायरल झाली आहे.
भोपाळ - कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशमध्ये सत्तेत असलेले काँग्रेसचे सरकार कोसळून आता दोन महिन्यांहून अधिक काळ लोटत आला आहे. दरम्यान, कमलनाथ सरकार पाडण्यामागे नेमकी कुणी भूमिका बजावली आणि ते नेमके कुणाच्या आदेशावरून पाडले गेले याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप तेव्हापासून सुरू आहेत. आता याबाबत मोठा गौप्यस्फोट करणारी एक ऑडियो क्लीन व्हायरल झाली आहे. या अॉडियो क्लीपमधील आवाज हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा असल्याचा दावा करण्यात येत असून, या क्लीपमधील संभाषणादरम्यान त्यांनी कुणाच्या आदेशावरून हे सरकार पाडले गेले याचा उल्लेख केल्याचा दावा करण्यात आला आहे.
यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने प्रसिद्ध केले आहे. मात्र या क्लीपच्या सत्त्यतेबाबत संबंधित वृत्तवाहिनीने पुष्टी केलेली नाही. या क्लीपमध्ये शिवराजसिंह चौहान इंदूरमधील सांवेर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संबोधित करत असून, हे सरकार कोसळले पाहिजे, असे केंद्रीय नेतृत्वाने ठरवले आहे. आता तुम्हीच सांगा की, ज्योतिरादित्य शिंदे आणि तुलसीभाई यांच्या मदतीशिवाय हे सरकार कोसळले असते का? अन्य कुठलाच मार्ग नव्हता.
दरम्यान, ही ऑडियो क्लीप समोर आल्यानंतर काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा म्हणाले की, भाजपा सुरुवातीपासूनच हे आरोप नाकारत आहे. मात्र काँग्रेसचे जे आमदार बंगळुरूला होते त्यांच्या आसपास भाजपाचे नेते दिसत होते. आता शिवराजसिंह चौहान यांनी कार्यकर्त्यांसमोर केलेल्या विधानामुळे काँग्रेसच्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच भाजपाचे केंद्रीय नेतृत्व या कारस्थानात सहभागी होते, तसेच जाणूनबुजून सरकार पाडण्यात आले. त्यासाठी शिंदे यांची मदत घेतली गेली. कारण त्यांच्या मदतीशिवाय सरकार कोसळले नसते. काँग्रेसच्या सरकारमध्ये कुठलेही मतभेद नव्हते. केवळ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्यांवर षडयंत्र रचून राज्यातील लोकप्रिय सरकार पाडले गेले, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहिलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी मार्च महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत २२ आमदारही.काँग्रेस सोडून भाजपात आले होते. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात येऊन कोसळले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अमेरिकेने चीनमध्ये पसरवले एलियन व्हायरस, होताहेत गंभीर परिणाम, चीनचा आरोप
ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली
गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन
coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली
आश्चर्यच! या देशांमध्ये अजूनही धावत नाही रेल्वे
गोष्ट सहा दिवसांच्या युद्धाची; इवलासा देश ठरला होता सात राष्ट्रांना भारी