Digvijaya Singh: जातीय हिंसाचारानंतर राजकारण तापले; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यावर अटकेची टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 13:25 IST2022-04-14T13:24:13+5:302022-04-14T13:25:44+5:30
Bhopal News: रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशात मोठा हिंसाचार झाला होता, त्याप्रकरणी वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे माजी मुख्यमंत्र्यावर 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Digvijaya Singh: जातीय हिंसाचारानंतर राजकारण तापले; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यावर अटकेची टांगती तलवार
भोपाळ:मध्य प्रदेशात रामनवमीला झालेला हिंसाचार थंडावला असला तरी राज्यातील राजकारण मात्र तापले आहे. राज्यातील जातीय हिंसाचारावरून काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह(Digvijaya Singh) आणि शिवराज सरकार आमने-सामने आले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या एका कथित वादग्रस्त ट्विटबद्दल आतापर्यंत 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे.
रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये झालेल्या हिंसाचारावर ट्विट केल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात होशंगाबादमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, ट्विट केलेला फोटो चुकीचा असेल तर मी तो काढून टाकला आहे. भाजप माझ्या विरोधात अजेंडा राबवत आहे. माझ्यावर एक लाख एफआयआर नोंदवा, मी घाबरत नाही, असे ते म्हणाले.
नेमकं प्रकरण काय आहे?
रामनवमीला झालेल्या हिंसाचारानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक फोटो शेअर केला होता. त्याला खरगोनमध्ये उसळलेल्या हिंसाचाराबद्दल सांगण्यात आले होते, परंतु नंतर तो काढून टाकण्यात आला. त्यावर भाजपने दिग्विजय सिंह यांच्यावर जाणीवपूर्वक जातीय हिंसा भडकावल्याचा आरोप केला. तसेच, मध्य प्रदेश सरकारने दिग्विजय सिंह यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याची मागणीही केली.
भाजप नेते काय म्हणाले?
मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा यांनी दिग्विजय सिंह यांना आता अटक करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ते वाचणार नाहीत, त्यांनी मोठा गुन्हा केला आहे, असे ते म्हणाले. हिंसाचारातील सामील असणाऱ्यांवर बुलडोझरने कारवाई केली जात असून, कोणत्याही दोषीला सोडले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.