कमलनाथ सरकार पुन्हा धोक्यात; मध्य प्रदेशात भाजपाचा नवा डाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 10:12 PM2020-03-05T22:12:25+5:302020-03-05T22:38:31+5:30
काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपाच्या काही नेत्यांनी जबरदस्तीने हरियाणातील एका हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे मंत्री जीतू पटवारी यांनी केला होता.
नवी दिल्ली: मध्य प्रदेशातीलकाँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बुधवारी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केला होता. परंतु मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हे दावे फेटाळून लावले असून सरकारला काहीही धोका नसल्याचे सांगितले होते. मात्र आता मंदसौरमधील सुवसरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हरदीप सिंग डंग यांनी राजीनामा दिल्याने कमलनाथ सरकारच्या अडचणी वाढल्या आहे.
हरदीप सिंग डंग यांच्यासह आणखी चार आमदारांना बंगळूरुमध्ये घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी मध्य प्रदेशमधील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत होता.
हरदीप सिंग डंग यांच्या राजीनाम्याबाबत कमलनाथ यांनी विचारले असता मला अद्याप त्यांच्याकडून कोणतेही पत्र आलेलं नाही असं सांगितले. तसेच हरदीप सिंग डंग यांच्यासोबत या विषयावर व्यक्तिशः चर्चा झाली नसल्यामुळे मी सध्या यावर काही बोलणार नाही असं कमलनाथ यांनी स्पष्ट केले आहे.
Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath: I have received information about Hardeep Singh Dang's resignation. I have not yet received any letter from him or discussed the matter in person. Until I meet him personally, making comments over it will not be appropriate. (file pic) https://t.co/mnHKrOizfepic.twitter.com/JY2G0hJ0zL
— ANI (@ANI) March 5, 2020
काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपाच्या काही नेत्यांनी जबरदस्तीने हरियाणातील एका हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे मंत्री जीतू पटवारी यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, माजी मंत्री नरोत्तम मिश्रा, भूपेंद्र सिंह आणि रामपाल सिंह यांच्यासह काही नेत्यांनी काँग्रेसच्या आमदारांना जबदरस्ती घेऊन गेल्याचा आरोप जीतू पटवारी यांनी केला होता. शिवराज सिंह चौहान यांना सत्तेची हाव आहे. त्यामुळेच सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्याकडून कटकारस्थानं आखली जात आहेत. मात्र यात ते यशस्वी होणार नाहीत. आम्ही हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांच्या संपर्कात आहोत. मीदेखील त्याच हॉटेलमध्ये थांबलो आहे. बहुजन समाज पार्टीच्या आमदार रमाबाई माझ्यासोबतच आहेत, अशी माहिती पटवारी यांनी दिली होती.
१० आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वीच कमलनाथ यांचं सरकार कोसळेल, अशी योजना होती. दिल्लीत दोन, तर बंगळुरुत एका ठिकाणी या आमदारांना थांबवण्यात येणार होतं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांच्याकडे आमदारांच्या बंगळुरू मुक्कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा सुगावा लागताच काँग्रेसनं त्यांच्या ११४ आमदारांना व्हिप बजावला होता. कोणत्याही आमदारानं पक्षाचा व्हिप अमान्य केल्यास त्याचं विधानसभेतलं सदस्यत्व रद्द होईल, असं संसदीय कार्यमंत्री गोविंद सिंह यांनी व्हिप जारी करताना म्हटलं होतं. राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यास त्याची किंमत संबंधित आमदाराला चुकवावी लागेल, असा इशाराही सिंह यांनी दिला होता.