Madhya Pradesh Crisis: काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये कोरोनाची लक्षणे; जयपूरहून आलेल्या आमदाराचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 09:09 AM2020-03-16T09:09:20+5:302020-03-16T09:11:45+5:30
Madhya Pradesh political Crisis: काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक बेंगळुरुमध्ये आहेत. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तेथे कोरोनाचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशमध्येकाँग्रेसच्या कमलनाथ सरकारसाठी आजचा दिवस अग्निदिव्यातून जाणारा ठरणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून राज्यपालांनी आजच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. यावर मध्यरात्रीच कमलनाथ यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना बहुमत चाचणीचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, काँग्रेसला कोरोनाची भीती सतावू लागली आहे.
काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक बेंगळुरुमध्ये आहेत. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तेथे कोरोनाचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. अखेर त्या आमदारांना काल दुसऱ्याच हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. आज ते भोपाळमध्ये परतण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे कांग्रेसचे उर्वरीत 85 आमदारांना जयपूरहून भोपाळमध्ये कालच सायंकाळी आणण्यात आले आहे. या आमदारांची काल कोरोना व्हायरसची चाचणी घेण्यात आली. विधानसभेत बहुमत चाचणी असल्याने त्यांची उपस्थिती महत्वाची आहे. अशातच काँग्रेंसच्याच एका आमदाराने आपल्या दोन सहकारी आमदारांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे.
काँग्रेसने 85 आमदारांना फुटण्याच्या भीतीने राजस्थावनच्या जयपूरमध्ये हलविले होते. त्याची आरोग्य चाचणी घेण्यात आली असून अधिकाऱ्यांनी सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे म्हटले आहे. मात्र, तरानाचे काँग्रेस आमदार महेश परमार यांनी हा धक्कादायक दावा केला आहे. आमच्या काही सहकाऱ्यांची प्रकृती खराब आहेय. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, असे परमार यांनी सांगितले. यावर पत्रकारांनी त्यांना मस्करी तर करत नाहीत ना, असा प्रश्न विचारताच 'काय बोलत आहात? आमदार असून मस्करी करणार का? देवही दुश्मनासोबत असे करणार नाही', असे उत्तर दिले आहे.
यातच बेंगळुरूमध्ये असलेल्या 22 आमदारांचीही भोपाळमध्ये कोरोना टेस्ट घेण्यात येणार असून यामुळे बहुमत चाचणीवर कोरोनाचे सावट आल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशमध्येज्योतिरादित्य शिंदेंनी बंड करत काँग्रेसचा राजीनामा दिल्याने काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. एकूण 22 आमदारांनी राजीनामे दिल्याने राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला मध्यरात्रीच बहुमत सिद्ध करण्याचे पत्र पाठविले आहे. तर कमलनाथ सरकारसमोरील अडचणींत वाढ झाली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बहुमत चाचणीनंतर कमलनाथ सरकारचे भवितव्य निश्चित होणार आहे.