पाकिस्तान झिंदाबाद बोलणाऱ्या आरोपीला कोर्टाने दिली शिक्षा; मंगळवारी २१ वेळा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:25 PM2024-10-17T12:25:18+5:302024-10-17T12:29:10+5:30

मध्य प्रदेश हायकोर्टाने पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा देणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर केला आहे.

Madhya Pradesh High Court has granted bail to the accused who raised Pakistan Zindabad slogans | पाकिस्तान झिंदाबाद बोलणाऱ्या आरोपीला कोर्टाने दिली शिक्षा; मंगळवारी २१ वेळा...

पाकिस्तान झिंदाबाद बोलणाऱ्या आरोपीला कोर्टाने दिली शिक्षा; मंगळवारी २१ वेळा...

MP High Court : 'पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद' अशा घोषणा देणाऱ्या एका व्यक्तीला मध्य प्रदेशउच्च न्यायालयाने अनोख्या अटींवर जामीन मंजूर केला आहे. आरोपीने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर त्याला अटक केली होती. त्यानंतर आरोपीच्या वकिलाने काही कठोर अटींसह जामीन देण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायालयाने एक वेगळीच अट घातली. न्यायालयाने घातलेल्या या अटींची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

मध्य प्रदेशउच्च न्यायालयाने पाकिस्तान झिंदाबाद घोषणा दिल्याच्या आरोपीला जामीन मंजूर केला. आरोपीला भोपाळ पोलीस स्टेशनमध्ये महिन्यातून दोनदा २१ वेळा राष्ट्रध्वजाला वंदन करण्याचे आणि भारत माता की जयची घोषणा देण्याचे निर्देश दिले आहेत. सुनावणी पूर्ण होईपर्यंत आरोपी फैजल उर्फ ​​फैजानला या अटीचे पालन उच्च न्यायालयाने आदेश येई पर्यंत करावे लागणार आहे. या आरोपीविरोधात गेल्या ७ महिन्यांपासून खटला सुरु आहे.

भोपाळ पोलिसांनी १७ मे महिन्यात आरोपी फैजलने पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या. यानंतर त्याला दोन समाजांत तेढ निर्माण करणे व राष्ट्रीय ऐक्याला धोका पोहोचवणे या आरोपांखाली आयपीसीच्या कलम १५३ अंतर्गत भोपाळमधील मिसरोड पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी पुढे सरकत नव्हती. त्यानंतर बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, आरोपी फैजलला राष्ट्रध्वजाला वंदन करण्याची आणि भारत माता की जयची घोषणा देण्याच्या अटीखाली जामीन मंजूर केला. दर महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत फैजलला हे करावे लागेल. याशिवाय आरोपी फैजलला ५० हजार रुपयांचा जातमुचलक भरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

फैजलची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याने देशविरोधी घोषणा देत गंभीर गुन्हा केला आहे, असे सांगत सरकारी वकिलांनी जामिनाला विरोध केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्ध १३ खटले आहेत आणि तो व्हिडिओमध्ये घोषणाबाजी करताना दिसत आहे, असं सुनावणीदरम्यान म्हटलं. दुसरीकडे, हा आरोपी घोषणा देत असल्याचा व्हिडीओ पुरावा आपल्याकडे असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. व्हिडीओचा फॉरेन्सिक रिपोर्ट येण्यासाठी उशीर लागत असल्यामुळे पोलिसांनीही वेळ वाढवून मागितली होती. मात्र न्यायालयाने फैजल याला जामीन मंजूर केला.

Web Title: Madhya Pradesh High Court has granted bail to the accused who raised Pakistan Zindabad slogans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.