'चाणक्य' शरद पवारांचा काँग्रेसला झटका; भाजपाविरोधी 'महाआघाडी'बाबत मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 08:21 AM2018-06-30T08:21:24+5:302018-06-30T08:21:28+5:30
पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतरच ठरेल, असं सूचक विधान करून शरद पवारांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं स्वप्नांना धक्का दिला आहे.
नवी दिल्लीः भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधून, भक्कम महाआघाडी उभी करून 2019च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा धक्का देण्याचा विचार करणाऱ्या काँग्रेसलाच अनपेक्षित झटका बसला आहे. महाआघाडी अस्तित्वात येणं शक्य नाही, असं स्पष्ट मत देशाच्या राजकारणातील 'चाणक्य' म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलंय. इतकंच नव्हे तर, पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतरच ठरेल, असं सूचक विधानही त्यांनी केलंय. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं स्वप्न धुसर झाल्याचं मानलं जातंय.
'माझ्या मते, महाआघाडी हा व्यवहार्य पर्याय नाही. आजची परिस्थिती ही 1977 सारखी आहे. तेव्हा, इंदिरा गांधी समर्थ नेत्या होत्या. देशाच्या पंतप्रधान होत्या. पण, आणीबाणीनंतर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या जनतेनं त्यांच्याविरोधात मतदान करून काँग्रेसला पराभूत केलं. त्या निवडणुकीत कुठलाही राजकीय पक्ष किंवा आघाडी नव्हती, तर निवडणुकीनंतर सगळे विजयी पक्ष एकत्र आले आणि जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं. त्यानंतर मोरारजी देसाई यांना पंतप्रधान म्हणून निवडण्यात आलं. त्यांना निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं नव्हतं. तसंच काहीसं 2019च्या निवडणुकीनंतर होऊ शकतं', असा अंदाज शरद पवार यांनी 'टाइम्स नाउ' या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत वर्तवला आहे. भाजपाविरोधी महाआघाडी व्हावी, असं अनेक सहकाऱ्यांना वाटतंय, पण मला हा प्रस्ताव तितकाचा पटलेला नाही. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी शरद पवार किंवा अन्य कुणाच्या नावाचा प्रश्नच येत नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं.
आम्हाला गृहित धरू नका, असं सूचित करत माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी शुक्रवारीच विरोधकांच्या एकजुटीबाबत शंका व्यक्त केली होती. आपले पुत्र कुमारस्वामी यांच्या शपथविधीला सर्व विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले, याचा अर्थ ते एकत्रित निवडणुका लढवतीलच असे नाही, असं देवेगौडा यांनी म्हटलं होतं. त्यांच्या पाठोपाठ, शरद पवार यांनीही महाआघाडीच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वास्तविक, गेली अनेक वर्षं तिसऱ्या आघाडीचे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जात होतं. पण आता त्यांनीच निवडणूकपूर्व महाआघाडी शक्य नसल्याचं मत मांडून केंद्रातील मोदी सरकारला सुखद धक्का दिला आहे.
उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये महाआघाडी झाल्यानं भाजपाला आपले गड गमवावे लागले होते. स्वाभाविकच, कर्नाटकमधील कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात विरोधकांची एकी पाहून मोदी-अमित शहा जोडी काळजीत पडली होती. पण, शरद पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे, लोकसभा निवडणुकीआधी महाआघाडी अस्तित्वात न आल्यास त्यांचं राजकीय गणित तुलनेनं सोपं होऊ शकतं.
I honestly don’t see Mahagathbandhan or something, says Sharad Pawar in conversation with @Kajal_Iyer#Modi2019SuperBoostpic.twitter.com/lF9qcNzWxK
— TIMES NOW (@TimesNow) June 29, 2018