महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 06:00 PM2024-10-20T18:00:36+5:302024-10-20T18:01:46+5:30
Maharashtra Assembly Election 2024: नुकत्याच झालेल्या हरयाणार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षितरीत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. हरयाणामध्ये बसलेल्या धक्क्यामुळे काँग्रेस पक्ष आणि पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीसाठी सतर्क झाले आहेत.
नुकत्याच झालेल्या हरयाणार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षितरीत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. हरयाणामध्ये बसलेल्या धक्क्यामुळे काँग्रेस पक्ष आणि पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीसाठी सतर्क झाले आहेत. हरयाणा विधानसभा निवडणुकीत चांगल्या स्थितीत असतानाही काँग्रेसला थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर मित्रपक्षांकडे दुर्लक्ष केल्याने काँग्रेसचा पराभव झाल्याचा दावा इंडिया आघाडीमधील मित्रपक्षांनी केला होता. त्यामधून धडा घेत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे अधिकाधिक जागांची मागणी करत आहे. मात्र जागावाटपावरून आघाडीमध्ये फूट पडणार नाही एवढाच दबाव काँग्रेसकडून आणला जात आहे. त्यासाठी काँग्रेसकडून सावधपणे पावलं टाकली जात आहेत.
याबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राज्यपाळीवरील कुठल्याही नेत्याने मनमानी करता कामा नये, यासाठी राज्याच्या विविध भागांसाठी ११ वरिष्ठ पर्यवेक्षक आणि दोन वरिष्ठ समन्वयकांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे मुस्लिम आणि दलितांची एक भक्कम मतपेढी आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेलचे १३ खासदार निवडून आले होते. तसेच सांगलीतील अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला होता.
काँग्रेसच्या नेत्यांच्या मते महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या काही वेगळ्या समस्या आहेत. हरयाणातील भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासारखा मोठा नेता काँग्रेसकडे महाराष्ट्रात नाही. मात्र याचा एक फायदा म्हणजे पक्षाला आपल्या केंद्रीय नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. सूत्रांनी सांगितले की, यावेळी जागावाटपामध्ये काँग्रेस पक्ष कुठल्याही दबावाखाली काम करणार नाही. हरणायामध्ये असे अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ज्यांची शिफारस राज्यातील बड्या नेत्यांनी केली होती. मात्र महाराष्ट्रामध्ये केवळ विजय मिळवू शकतील, अशा नेत्यांना उमेदवारी देण्यावर टीम राहुलने विशेष लक्ष्य केंद्रित केले आहेत त्याबरोबरच उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांनी बंडखोरी करू नये यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावरील नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
त्याबरोबरच महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेला प्रत्युत्तर देण्यासाठी पाच गॅरंटीची घोषणा करण्यात येणार आहे. हरयाणामध्ये जाहीरनामा उशिरा जाहीर करण्यात आल्याचा फटका पक्षाला बसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पाच गॅरंटीची घोषणा करण्याचा विचार काँग्रेसकडून गांभीर्याने सुरू आहे. यामध्ये रोख मदत, महिलांना मोफत बस प्रवास, १० किलो मोफत धान्य, स्वस्त वीज आणि बेरोजगारी भत्ता यांचा समावेश आहे. त्याबरोबरच जातनिहाय जनगणनेचं आश्वासन दिलं जाण्याची शक्यता आहे.