महाराष्ट्र काँग्रेसची दिल्लीत बैठक; राहुल गांधींनी ठरवली विधानसभा निवडणुकीची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 08:43 AM2024-06-26T08:43:28+5:302024-06-26T08:45:10+5:30

राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक, विधानसभा निवडणुकीवर झाली चर्चा, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंनी केले मार्गदर्शन

Maharashtra Congress meeting in Delhi; Rahul Gandhi decided the strategy for the assembly elections | महाराष्ट्र काँग्रेसची दिल्लीत बैठक; राहुल गांधींनी ठरवली विधानसभा निवडणुकीची रणनीती

महाराष्ट्र काँग्रेसची दिल्लीत बैठक; राहुल गांधींनी ठरवली विधानसभा निवडणुकीची रणनीती

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या दमदार यशानंतर काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी दिल्लीत राज्यातील काँग्रेस नेत्यांची वरिष्ठांसोबत बैठक पार पडली. आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढल्या जातील असं या बैठकीत ठरलं आहे. त्यानुसार लवकरच मित्रपक्षांसोबत समन्वयासाठी एक समिती बनवा आणि संयुक्त रणनीतीवर काम करा अशा सूचना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दिल्या आहेत. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षातील इतर नेते आणि काही नवनियुक्त खासदारही सहभागी होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. त्यात मविआतूनच निवडणूक लढवण्यावर काँग्रेस नेतृत्व आग्रही होते. त्याशिवाय माध्यमांसमोर कुठलीही भूमिका मांडताना एका पक्षाची नको तर महाविकास आघाडीची भूमिका असावी असंही नेत्यांना सांगण्यात आले आहे.

तर महाराष्ट्रात आम्ही लोकसभा प्रतिकुल परिस्थितीत लढल्या. जनतेनं मविआला पाठिंबा दिला. महाराष्ट्राला देशातील विकसित आणि समृ्द्ध राज्य बनवायचं आहे. परंतु भाजपा सरकारने लोकांना महागाई आणि बेरोजगारीच्या संकटात टाकलं. राज्यातील शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय झाला. देशात परिवर्तनाचं चित्र आहे महाराष्ट्राने याचे स्पष्ट संकेत दिलेत. आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटलं आहे.

मित्रपक्षांवर काँग्रेस नेते नाराज

सूत्रांनुसार, पक्षाच्या बैठकीत काँग्रेसच्या काही नेत्यांनी ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तक्रारी मांडल्या आणि नाराजी जाहीर केली. परंतु यावर फारसं लक्ष न देता पुढे चर्चा करू असं काँग्रेस नेतृत्वानं म्हटलं. भाजपाला हरवणं ही आपल्या सगळ्यांचं प्राधान्य आहे असं राहुल गांधींनी नेत्यांना सूचना केल्या. 

नाना पटोलेंच्या अधिकारांवर मर्यादा?

आगामी काळात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भूमिका आणि प्रभाव वाढणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकार मर्यादित केले जातील. पुढील काळात सत्ता विकेंद्रीकरण करण्याचे काँग्रेसनं संकेत दिले. निवडणुकीबाबत जे काही निर्णय घेतले जातील ते दिल्लीत बसून घेण्याऐवजी राज्य, जिल्हास्तरीय प्रस्ताव येतील. बदललेल्या रणनीतीमुळेच काँग्रेसला इतके मोठे यश मिळाल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. त्यात सत्तेच्या विकेंद्रीकरणावर जोर दिला अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Web Title: Maharashtra Congress meeting in Delhi; Rahul Gandhi decided the strategy for the assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.