महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा नाटकी होता; भाजपा खासदाराचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 08:51 AM2020-02-03T08:51:58+5:302020-02-03T08:55:14+5:30
नुकताच राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या टीकेवरील वाद शमला आहे. तोपर्यंत भाजपाच्या खासदारांने गांधींवर टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
बेंगळुरू : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले आहे. गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला स्वातंत्र्य लढा नाटकी होता, असे हेगडे म्हणाले. यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
बेंगळुरूतील एका कार्यक्रमावेळी हेगडेंनी हे वक्तव्य केले आहे. हेगडे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. महात्मा गांधींचा स्वातंत्र्यलढा हा ब्रिटीश सरकारच्या संमती आणि पाठिंब्याने रचला गेला होता. या तथाकथीत नेत्यांनी एकदाही पोलिसांचा मार खाल्ला नव्हता. ही खरीखुरी लढाई नव्हती. हा परस्पर संगनमताने रचलेला स्वातंत्र लढा होता, असे वक्तव्य हेगडे यांनी केले.
यावरच न थांबता त्यांनी गांधी जी काही आंदोलने करायचे, उपोषण करायचे ते ही नाटकच होते असे म्हटले आहे. कांग्रेसचे समर्थक सांगतात की आमरण उपोषण आणि सत्याग्रह करून भारताला स्वातंत्र्य मिळाले हे खरे नाही. इंग्रजांनी यांच्या सत्याग्रहामुळे देश सोडला नव्हता. तर निराशेतून देश सोडला होता. मात्र, असे लोक आमच्या देशात महात्मा बनले, असे विधान हेगडे यांनी केले.
नुकताच राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या टीकेवरील वाद शमला आहे. तोपर्यंत भाजपाच्या खासदारांने गांधींवर टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.