‘मोदी हटाव’ हेच मुख्य लक्ष्य; सध्या तरी लग्नाचा विचार नाही - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 04:51 AM2018-08-15T04:51:21+5:302018-08-15T04:51:56+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेवरून हटविणे हेच सध्या आपले एकमेव लक्ष्य असल्याने लग्न करण्याचा आपला तूर्तास तरी विचार नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे सांगितले.
हैदराबाद - आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेवरून हटविणे हेच सध्या आपले एकमेव लक्ष्य असल्याने लग्न करण्याचा आपला तूर्तास तरी विचार नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे सांगितले.
सुमारे तासाभराच्या वार्तालापात स्वत:च्या लग्नाविषयी विचारलेल्या प्रश्नास गांधी यांनी ‘माझे लग्न काँग्रेस पक्षाशी झाले आहे,’ एवढेच त्रोटक उत्तर दिले.
एका ज्येष्ठ पत्रकाराने मोदींचा पराभव केला जाऊ शकतो, यावर शंका घेतल्यावर राहुल गांधी यांनी सन २०१९ मध्ये मोदी पराभूत होऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेवर येईल, असा विश्वास पैज मारत व्यक्त केला.
‘रालोआ’मधील शिवसेनेसह इतरही काही मित्रपक्षांनात मोदी पुन्हा पंतप्रधान व्हायला नको आहेत, त्यामुळे ते पुन्हा पंतप्रधान होण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, मोदींना पुन्हा पंतप्रधान व्हायचे असेल, तर भाजपाला स्वत:ला किमान २३० जागा जिंकाव्या लागतील. उत्तर प्रदेश व बिहारमधील सर्व जागा जिंकल्याखेरीज त्यांना हे शक्य होणार नाही. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेशात व बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल काँग्रेससोबत आल्यावर भाजपाला ते कदापि शक्य होणार नाही.
निवडणुकीच्या आधी भाजपाविरोधी महाआघाडी नक्की आकाराला येईल, असे सांगूत ते म्हणाले की, यासाठी समविचारी पक्षांशी बोलणी व संपर्क करणे सुरू आहे. यात पूर्वी जे आमच्या सोबत होते असे पक्ष व काही नवे पक्षही आहेत.
कर्नाटकमध्ये मित्रपक्षाला आधीच मुख्यमंत्रीपद देऊ करण्याचा जो यशस्वी प्रयोग केला, तेच ‘मॉडेल’ लोकसभा निवडणुकीसाठीही वापरणार का, असे विचारता राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान कोणी व्हायचे, हा विचारही सध्या माझ्या मनात नाही. भाजपा पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. एकदा ते उद्दिष्ट साध्य झाले की, नंतर पंतप्रधान कोणी व्हायचे, याचा विचार केला जाईल.
गांधी म्हणाले की, मोदींशी माझे व्यक्तिश: मतभेद नाहीत, पण त्यांच्याशी माझे सैधांतिक व धोरणांविषयी नक्कीच ठाम मतभेद आहेत. काँग्रेस गेली कित्येक दशके भाजपा आणि रा. स्व. संघाच्या विचारधारेच्या विरोधात लढत आली आहे. याच सैधांतिक आधारावर समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे.
बहुसंख्य समाजाचे लांगूलचालन करण्यासाठी हल्ली तुम्ही सौम्य हिंदुत्वाकडे झुकला आहात का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, मी कट्टर किंवा सौम्य असे कोणतेच हिंदुत्व मानत नाही. मी मंदिरांमध्ये जाते व धर्मगुरूंना भेटतो, यावरून तुम्ही असे म्हणत असाल तर ते चुकीचे आहे. मी सन २००४ पासून हे करत आलो आहे. मी जेव्हा एखाद्या राज्यात जातो, तेव्हा मला धर्मगुरुंकडून निमंत्रण येते. त्यामुळे त्यांना भेटण्यात मला काही गैर वाटत नाही.
मोदींशी गळाभेट कशी वाटली?
पंतप्रधान मोदी यांची लोकसभेत तुम्ही गळाभेट घेतलीत, ती कशी वाटली, असे विचारता राहुल गांधी म्हणाले, माझ्याकडून त्या भेटीत प्रेमाचा व सद््भावनेचा ओलावा होता, पण मोदींना मात्र ती ‘थंड’ वाटली. मी कोणाचाही द्वेष करत नाही, हे व्यक्त करण्यासाठी मी ती गळाभेट घेतली, पण मोदींना त्यांचे राजकीय विरोधक मनापासून आवडत नाहीत. ते विरोधकांना मान देत नाहीत. ते कोणाचेही ऐकत नाहीत, पण सर्वांनी त्यांचे ऐकावे, असे त्यांना वाटते.