Mallikarjun Kharge: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आपल्याच घरात धोबीपछाड; एका मताने भाजपचा विजय...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 08:44 PM2023-03-23T20:44:16+5:302023-03-23T20:45:24+5:30
Mallikarjun Kharge: आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल महत्वाचा आहे.
नवी दिल्ली: भारतातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना त्यांच्या गृहजिल्ह्यात म्हणझेच कलबुर्गी येथे मोठा धक्का बसला आहे. येथे झालेल्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा भाजपकडून पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, केवळ एका मताने काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
असा आहे निकाल...
मे महिन्यात कर्नाटकात विधानसभा निवडणुका प्रस्तावित आहेत. त्यामुळे हा निकाल महत्वाचा मानला जात आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत 33 मते मिळालेल्या विशाल दरगी यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश कपनूर यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. त्याचवेळी शिवानंद पिस्ती यांनी त्यांच्या काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी विजयालक्ष्मी यांचा पराभव करुन उपमहापौरपद काबीज केले.
#WATCH | Karnataka: BJP wins Mayor, Deputy posts in Kalaburagi City Corporation
— ANI (@ANI) March 23, 2023
Vishal Dargi, representing ward number 46, and Shivanand Pisti, from ward number 25, were elected Mayor and Deputy Mayor. pic.twitter.com/IKWfYNkGcJ
प्रकरण कोर्टात गेले
कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी कलबुर्गीच्या महापौर आणि उपमहापौरांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. कलबुर्गी शहर महानगरपालिकेच्या काँग्रेस सदस्या वर्षा जेन यांनी भाजपने बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जागांपेक्षा कमी जागा जिंकल्या आहेत आणि सत्ता काबीज करण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याच्या कारणावरुन महापौरपदाची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती ज्योती मुल्लिमानी यांनी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुका आधीच जाहीर झाल्या असून या प्रक्रियेला न्यायालय स्थगिती देऊ शकत नाही, असे सांगत याचिका फेटाळून लावली.
कर्नाटक भाजपसाठी महत्वाचे
येत्या विधानसभा निवडणुकीत हा विजय भाजपसाठी टॉनिक म्हणून काम करेल. राज्यात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपने 2008 साली दक्षिणेतील हे राज्य काबीज केले होते. 2013 च्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार पुनरागमन केले. 2018 च्या निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत परतला आणि बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. सभागृहात बहुमत नसल्यामुळे त्यांना मुदतीपूर्वी राजीनामाही द्यावा लागला होता. नंतर पुन्हा सरकार स्थापन झाले, पण सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. यानंतर बसवराज बोम्मई यांच्या हाती कमांड देण्यात आली.